दिल्ली स्फोट प्रकरणी दोन तासांत संशयित ताब्यात; फरिदाबाद दहशतवादी गटाशी संबंधाचा तपास सुरू

 


दिल्ली : राजधानी दिल्ली हादरवून टाकणाऱ्या लाल किल्ला परिसरातील भीषण स्फोटानंतर फक्त दोन तासांच्या आत सुरक्षा यंत्रणांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. स्फोट झाल्यानंतर लगेचच दिल्ली पोलिस आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. प्राथमिक तपासानुसार हा स्फोट घातपाताचा भाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या स्फोटात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत.

सोमवारी सायंकाळी नेमके 6 वाजून 55 मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळील पार्किंगमध्ये एक कार स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरात दोनदा मोठा आवाज ऐकू आला आणि काही क्षणांत आग भडकली. आसपास उभ्या असलेल्या अनेक गाड्या जळून खाक झाल्या. घटनास्थळावर तात्काळ अग्निशमन दल आणि एनएसजीच्या टीम दाखल झाल्या.

या भीषण स्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी तात्काळ हाय अलर्ट जारी केला असून शहरातील सर्व मेट्रो स्टेशन, प्रमुख बाजारपेठा आणि सरकारी इमारतींवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तपासादरम्यान सुरक्षा दलांनी दोन तासांच्या आत एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. या संशयिताकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्फोटासाठी वापरलेली कार ही हरियाणातील गुरुग्राम येथील असल्याची माहिती समोर आली आहे. ही कार आय-ट्वेन्टी प्रकारातील असून तिचा नंबर गुरुग्रामचा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि जखमींना रुग्णालयात भेट देऊन दिलासा दिला.

दरम्यान, स्फोटाच्या काही तास आधी हरियाणातील फरिदाबादमध्ये दिल्ली पोलिस आणि स्थानिक ATS ने मोठी कारवाई केली होती. या कारवाईत सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 350 किलो स्फोटक आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या गटात दोन डॉक्टरांचा समावेश असल्याचेही उघड झाले आहे. फरिदाबाद मेडिकल कॉलेजमधून ही कारवाई करण्यात आली असून ते ठिकाण दिल्लीतील स्फोटस्थळापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे. त्यामुळे दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचा सखोल तपास केला जात आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडे सोपविण्याची शक्यता व्यक्त केली आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज गोळा करून तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिल्ली स्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून प्रमुख शहरांमध्ये तपासणी वाढविण्यात आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानीतील सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


----------- समाप्त —---------







Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने