नेटफ्लिक्सच्या ‘मनी हाईस्ट’ वेब सीरिजपासून प्रेरित टोळीने दिल्लीमध्ये 150 कोटींचा सायबर फसवणुकीचा खेळ खेळला. ‘प्रोफेसर’, ‘अमान्डा’ आणि ‘फ्रेडी’ या नावांनी लोकांना शेअर बाजारात गुंतवणुकीचं आमिष दाखवून लुटलं. पोलिसांना चीनशी जोडलेले धागेदोरेही सापडले आहेत.
नवी दिल्ली : सिनेमा आणि वेब सीरिजमधील गुन्हे आता वास्तवात उतरले आहेत! नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध वेब सीरिज ‘मनी हाईस्ट’ पासून प्रेरणा घेत, दिल्लीतील एका सायबर टोळीने तब्बल ₹150 कोटींची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या टोळीतील सदस्यांनी सीरिजमधील पात्रांवरूनच आपली नावे ठेवली होती ‘प्रोफेसर’, ‘अमान्डा’ आणि ‘फ्रेडी’!
दिल्ली पोलिसांनी या तिघांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्या गँगने देशभरातील 300 हून अधिक लोकांना आर्थिक जाळ्यात अडकवलं असल्याचं समोर आलं आहे.
ऑनलाईन गुंतवणुकीचे आमिष दाखवून या गँगने लोकांना त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायला लावले. सुरुवातीला थोडासा नफा दाखवून विश्वास संपादन केला, आणि नंतर मोठी रक्कम मिळाल्यावर खातेच ब्लॉक केलं जात असे.
फसवणुकीचा मुख्य सूत्रधार, वकिल असलेला अर्पित उर्फ ‘प्रोफेसर’, तर कंप्युटर सायन्सचा पदवीधर प्रभात वाजपयी उर्फ ‘अमान्डा’, आणि अब्बास उर्फ ‘फ्रेडी’ यांनी लोकांना शेअर मार्केटवरील खोट्या टिप्स देऊन फसवलं.
या टोळीने व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर अनेक गुप्त ग्रुप्स तयार केले, जेथे ते गुंतवणुकीचे सल्ले देत. “मोठा परतावा मिळेल” अशा आश्वासनांनी लोकांना जाळ्यात ओढण्यात आलं. जेव्हा कुणी पैसे काढण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा त्यांना धमक्या दिल्या जायच्या आणि आणखी पैसे टाकण्यास भाग पाडलं जात असे.
दिल्ली पोलिसांनी नोएडा आणि सिलीगुडी येथे मोठ्या प्रमाणात धाडी टाकल्या. तपासात पोलिसांनी ११ मोबाईल फोन, १७ सिम कार्ड्स, १२ बँक पासबुक, ३२ डेबिट कार्ड्स आणि शेकडो ऑनलाइन ट्रान्झॅक्शनचे पुरावे जप्त केले आहेत.
पोलिस अधिकारी सांगतात “या टोळीने आलिशान हॉटेलमधून संपूर्ण ऑपरेशन चालवलं. फक्त मोबाईल आणि लॅपटॉपच्या साहाय्याने त्यांनी देशभर फसवणूक केली.”
तपासादरम्यान पोलिसांना चीनशी जोडलेले महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. गँगने केलेल्या ट्रान्झॅक्शनचे कॉल रेकॉर्ड आणि इंटरनेट लॉग्स तपासल्यानंतर असे लक्षात आले की,
ही फसवणूक नोएडा, गुवाहटी ते चीनपर्यंत पसरलेली होती.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या रॅकेटमागे काही चीनी संशयित सक्रिय आहेत. ते सायबर फसवणुकीचे नियंत्रण परदेशातून करतात. या घटनेने पुन्हा सायबर गुन्ह्यांबाबत गंभीर इशारा दिला आहे. ‘मनी हाईस्ट’पासून प्रेरित ही गुन्हेगारी कथा दाखवते की डिजिटल युगात गुन्हेगार किती स्मार्ट आणि संगठित झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, अशा घटनांनी भारतातील सायबर सुरक्षा व्यवस्थेची कसोटी लागली आहे.
‘मनी हाईस्ट’मधील काल्पनिक चोरी आता वास्तवात उतरली आहे. ‘प्रोफेसर’ आणि त्याच्या साथीदारांनी देशभरात 150 कोटींची फसवणूक करत सायबर गुन्ह्यांचा नवा अध्याय सुरू केला आहे. चीनशी संबंध उघड झाल्यानंतर या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय रूप घेण्याची शक्यता वाढली आहे.
