मराठवाडा दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारवर थेट हल्ला केला. शेतकरी मदत, कर्जमाफी आणि अतिवृष्टी नुकसानावर सरकार दगाबाज ठरल्याचा आरोप करत “हे सरकार दिल्लीच्या आज्ञा ऐकतं, मराठवाड्याच्या आक्रोशाकडे नाही,” असा रोष त्यांनी व्यक्त केला.
पैठण : मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उद्धव ठाकरे आक्रमक मोडमध्ये आले आहेत. चार दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होताच ठाकरे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला केला. “हे सरकार मराठवाड्याशी दगाबाजी करतंय. शेतकऱ्यांच्या अश्रूंवर खेळतंय आणि कर्जमाफीचं आश्वासन फक्त कागदावर आहे!”असा आरोप केला.
ठाकरे म्हणाले “ज्यांच्या पिकांचं नुकसान हेक्टरी लाखो रुपयांचं झालं, त्या शेतकऱ्यांना सरकार जून २०२६ पर्यंत थांबायला सांगतं! हा विनोद नाही का? हेक्टरी ५० हजारांची मदत द्या आणि त्वरित कर्जमाफी जाहीर करा!”
त्यांनी सरकारवर आरोप केला की, कर्जमाफीचा निर्णय जाणीवपूर्वक लांबवला जातो आहे, कारण निवडणुकीच्या आधी “मोठं जाहीरनाम्याचं राजकारण” करण्याची तयारी सुरू आहे.
ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना म्हटलं “मुख्यमंत्री मराठवाड्याच्या मातीत फिरायला तयार नाहीत, पण भाषणांमधून महाराष्ट्र वाचवायचं म्हणतात. शेतकऱ्यांचं दु:ख त्यांना दिसत नाही, कारण त्यांचे डोळे दिल्लीकडे आहेत.” शिवसेनेचे कार्यकर्ते या दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, ठाकरे यांनी “शेतकरी न्याय मोर्चा” जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत.
ठाकरे यांनी म्हटलं “महायुतीने शेतकऱ्यांना फक्त घोषणांची भेट दिली आहे. हा ‘घोषणांचा खेळ’ आता संपवायचा वेळ आली आहे.” त्यांच्या या वक्तव्यांमुळे मराठवाड्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, भाजप नेते प्रत्युत्तर देत आहेत. गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तरात म्हटलं
“उद्धव ठाकरे दौऱ्यांवर नाही, फक्त भाषणांवर राजकारण करतायत. शेतकऱ्यांना काय दिलं हे त्यांनी सांगावं.”
मराठवाड्यात ठाकरे यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.स्थानिक शेतकरी म्हणतात “सरकार फक्त निवडणुकीत दिसतं, पण उद्धवसाहेब आमचं दु:ख ऐकायला आलेत.”
राजकीय तज्ज्ञांच्या मते, ठाकरे यांचा हा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा ठरणार आहे. शेतकरी असंतोष आणि प्रशासनाच्या विलंबामुळे सरकारविरोधी भावना तीव्र झाली असून, उद्धव ठाकरे यांनी ती थेट भांडवल बनवली आहे.
उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा हा फक्त जनसंपर्क मोहिम नाही, तर फडणवीस सरकारविरुद्ध शेतकऱ्यांच्या रागाचा राजकीय विस्फोट आहे असे सांगितले जात आहे.
“शेतकऱ्यांना न्याय, सरकारला जबाबदारी” या घोषणेसह ठाकरे यांनी मराठवाड्यात राजकारणाच्या तापमानात जबरदस्त वाढ केली आहे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
