राहुल गांधींनी हरियाणातील निवडणुकीत 25 लाख मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप करत “ऑपरेशन सरकार चोरी” सुरू केल्याचा दावा केला. त्यांनी ब्राझिलियन मॉडेलने 22 वेळा मतदान केल्याचे पुरावे दाखवले, तर निवडणूक आयोगाने आरोप फेटाळले. जाणून घ्या दोन्ही बाजूंची संपूर्ण माहिती.
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी “ऑपरेशन सरकार चोरी” या नावाने आज मोठे स्फोटक आरोप केले. त्यांनी दावा केला की, हरियाणा विधानसभा निवडणुकीत तब्बल 25 लाख मतं चोरीला गेली असून, भाजप आणि निवडणूक आयोगाने यामध्ये संगनमत केल्याचा ठोस पुरावा त्यांच्या “H-Files” मध्ये आहे.
पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मोठ्या स्क्रीनवर “पुरावे” दाखवले. त्यात त्यांनी सांगितले की “एका महिलेनं हरियाणात 22 वेळा मतदान केलं. ती महिला ब्राझिलियन मॉडेल आहे! तिचा फोटो मतदार यादीत अनेक ठिकाणी दिसतो. काही मतदारांचं वय आणि फोटो वेगळा आहे, काहींचं नाव एकाच पत्त्यावर दहावेळा आहे. ही सर्वात मोठी मत चोरी आहे!”
त्यांच्या म्हणण्यानुसार, 5.21 लाख दुबार मतदार, 93 हजार अमान्य मतदार, आणि 19 लाखांहून अधिक “बुल्क मतदार” असे प्रकार हरियाणात आढळले. राहुल गांधी म्हणाले,
निवडणूक आयोगाकडे डुप्लिकेट मतदार काढण्यासाठी सॉफ्टवेअर आहे. पण ते वापरलं जात नाही. यासाठी AIचीही गरज नाही काही सेकंदांत हे शक्य आहे. मग का नाही करत? कारण भाजपला मदत करायची आहे!”
राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने तातडीने प्रतिक्रिया दिली. आयोगाने हे सर्व आरोप “पूर्णपणे निराधार आणि हास्यास्पद” (Completely absurd) असल्याचं म्हटलं आहे. आयोगाने सांगितले “हरियाणातील मतदार यादी सर्व राजकीय पक्षांना प्रकाशनापूर्वी आणि नंतर दिली होती. जर कोणत्याही त्रुटी किंवा डुप्लिकेट नावांवर आक्षेप होते, तर कायदेशीररित्या त्या वेळी अपील करता आलं असतं. मात्र, काँग्रेससह कोणत्याही पक्षाने अपील दाखल केलेले नाही.” तसेच, आयोगाने नमूद केले की, “पोलिंग एजंट हे प्रत्येक बूथवर उपस्थित असतात. त्यांना अशा घटना दिसल्या असत्या तर त्यांनी त्या वेळी विरोध नोंदवला असता. त्यामुळे आता केलेले आरोप फक्त राजकीय हेतूंसाठी वाटतात.”
राहुल गांधींच्या समर्थनार्थ राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, “ईसीआयकडून राहुल गांधींकडून ‘ॲफिडेव्हिट मागणे’ ही गोष्टच हास्यास्पद आहे. निवडणूक आयोगाने चौकशी करून सत्य समोर आणावे.”
राहुल गांधींचे आरोप नक्कीच चर्चेचा विषय बनले आहेत. सोशल मीडियावर “#VoteChori” आणि “#OperationSarkarChori” हे ट्रेंड होत आहेत.
मात्र, निवडणूक आयोगाने त्वरित स्पष्टीकरण देत सर्व आरोप नाकारले आहेत. आता हे प्रकरण न्यायालयीन चौकशीपर्यंत पोहोचेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
____________________
---