जालना : मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जालना पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. बीड जिल्ह्यातून हा कट रचल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
ही तक्रार मिळताच पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. आणि यावर आता स्वतः मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले “हा कट खरा आहे, मोठ्या व्यक्तीचा हात आहे!
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील म्हणाले, “हे सत्य आहे. माझ्या जीवावर उठण्याचा कट शिजला गेला आहे. हत्या घडवून आणण्याचा किंवा घातपात करण्याचा प्रयत्न झाला आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक स्वतः या प्रकरणात लक्ष घालत आहेत. लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.”
त्यांनी पुढे म्हटलं, “हा कट खूप मोठ्या व्यक्तीनं रचला आहे, हे तपासातून स्पष्ट होईल. मी उद्या सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन यावर सविस्तर बोलणार आहे. सध्या मी त्या सर्व पुराव्यांची पाहणी करत आहे.”
दरम्यान, आपल्या विरोधात कट रचणाऱ्यांना जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिला. ते म्हणाले, “बाळ तुला सांगतो तू खूप चुकीच्या ठिकाणी हात घातलास. असे आम्ही अनेक पाहिले आहेत. तू खूप चुकीचं पाऊल उचललं आहेस. ज्यांनी कट रचला त्यांना मी इशारा देत आहे. आम्ही मराठे आहोत हे लक्षात ठेवा. मी खंबीर आहे.”
त्यांनी मराठा बांधवांना आवाहन केलं “मराठा समाजातील बांधवांना मी सांगतो, शांत राहा. घाबरू नका.” मनोज जरांगे पाटील यांच्या या गौप्यस्फोटामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षण चळवळीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आलं आहे. पोलीस तपास वेगाने सुरू असून, लवकरच या कटामागील सूत्रे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याची तक्रार जालना पोलिसांकडे दाखल झाली असून, दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. जरांगे पाटील यांनी यावर गंभीर प्रतिक्रिया देत, “हा कट खरा असून मोठ्या व्यक्तीचा हात आहे,” असा दावा केला आहे.
