1xBet सट्टेबाजी प्रकरणात ईडीची मोठी कारवाई! माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, शिखर धवन यांची संपत्ती जप्त!!

नवी दिल्ली : देशभरात चर्चेत असलेल्या 1xBet सट्टेबाजी प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या नावावर असलेली ११.१४ कोटी रुपयांची संपत्ती तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), २००२ अंतर्गत करण्यात आली आहे.

रैना आणि धवन यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त

ईडीच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या संपत्तीत

सुरेश रैना यांच्या नावावर ६.६४ कोटी रुपयांच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा समावेश आहे, तर शिखर धवन यांच्या नावावर सुमारे ४.५ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. या कारवाईनंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून, ईडीच्या चौकशीचे वर्तुळ आता अधिक घट्ट झाले आहे.

ईडीच्या तपासात उघड झालं आहे की, रैना आणि धवन यांनी परदेशी सट्टेबाजी कंपन्यांशी करार करून 1xBet आणि त्याचे उपब्रँड 1xBat, 1xBat Sporting Lines यांची प्रसिद्धी केली, आणि त्याबदल्यात त्यांना विदेशातून पैसे दिले गेले. हे पैसे सट्टेबाजीतून कमावलेले काळे पैसे असल्याचा आरोप ईडीने केला आहे. या व्यवहारांमध्ये जटिल आर्थिक लेनदेन आणि परदेशी रूट्सचा वापर करून पैशांचा मूळ स्रोत लपवण्यात आला होता.

तपासात असेही आढळले आहे की, 1xBet कंपनीने भारतात हजारो खोटी बँक खाती तयार करून पैशांची देवाणघेवाण केली. आतापर्यंत ६ हजाराहून अधिक फेक अकाऊंट्स आढळली आहेत. या खात्यांद्वारे सट्टेबाजीची रक्कम विविध पेमेंट गेटवेद्वारे पाठवून मूळ स्रोत लपवण्यात आला.

अनेक पेमेंट गेटवे विना केवायसी व्यापारी (मर्चंट) जोडत असल्याचेही ईडीने नमूद केले आहे.

या संपूर्ण साखळीतून १००० कोटी रुपयांहून अधिक मनी लॉन्ड्रींग झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ईडीने या प्रकरणात देशभरातील चार पेमेंट गेटवेसवर छापेमारी केली असून, ६० हून अधिक बँक खाती फ्रीज करण्यात आली आहेत. सुमारे चार कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोठवण्यात आली आहे.

ईडीने सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की,

 “कोणत्याही ऑनलाईन सट्टेबाजी, जुगार किंवा अशा प्रकारच्या गुंतवणुकीपासून दूर राहा. हे केवळ आर्थिक नुकसानच पोहोचवत नाही, तर मनी लॉन्ड्रींग आणि बेकायदेशीर कारवायांना चालना देते.”

तसेच कोणत्याही संशयास्पद ऑनलाईन व्यवहाराची किंवा जाहिरातीची माहिती स्थानिक पोलिस किंवा ईडी कार्यालयाला देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

1xBet सट्टेबाजी प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांची ११.१४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. हे दोघे परदेशी सट्टेबाजी प्लॅटफॉर्मच्या प्रसिद्धीत सहभागी असल्याचा ईडीचा दावा आहे. तपासात १००० कोटींहून अधिक काळ्या पैशांचा ट्रेल समोर आला असून, देशभरात ईडीची चौकशी सुरू आहे.



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने