मुंबईकरांसाठी पुन्हा संकट? लोकल सेवा ठप्प होण्याची शक्यता; कर्मचारी संघटनेच्या इशाऱ्याने चिंता वाढली !

 


मुंबई: मुंबईमध्ये पुन्हा  लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे झालेल्या आंदोलनानंतर सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने (CRMS) ‘नियमानुसार काम’ करण्याचा इशारा दिल्याने लाखो प्रवाशांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. गर्दीच्या वेळी केलेल्या आंदोलनामुळे CRMS च्या दोन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संघटनेने स्पष्ट केले की, अन्याय होत असल्यास कर्मचाऱ्यांना नियमांनुसार धीम्या गतीने काम करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

मुंब्रा स्थानकाजवळ पाच महिन्यांपूर्वी धावत्या लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झालेल्या दुर्घटनेनंतर दोन रेल्वे अधिकाऱ्यांवर दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याची मागणी CRMS ने केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार VJTI चा अहवाल सदोष असून रेल्वे कर्मचाऱ्यांवर खोटे आरोप लावले जात आहेत. अशा प्रकारे बाह्य संस्थांकडून होत असलेल्या दबावामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास खचत आहे आणि त्यांना प्रशासनाचे की बाहेरील संस्थांचे, कोणाचे ऐकावे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. CSMT येथील फलकावर संघटनेने लिहून ठेवले आहे की, परिस्थिती बिघडल्यास त्यांना ‘नियमानुसार काम’ मोहीम राबवावी लागेल.

CRMS चे अध्यक्ष प्रवीण वाजपेयी यांनी स्पष्ट केलेले आहे की, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोरील आंदोलन संपल्यानंतर काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोटरमन-गार्ड लॉबीसमोर उत्स्फूर्त आंदोलन केले. मात्र आंदोलनाला दोन दिवस उलटले तरी पोलिसांनी आंदोलकांना नोटीस किंवा अटक केलेली नाही. याबाबत रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपास सुरू असून वरिष्ठांच्या सूचनांनुसार कारवाई केली जाईल.

या वादाची पार्श्वभूमी असलेली CSMT येथील घटना अत्यंत गंभीर होती. काही दिवसांपूर्वी गर्दीच्या वेळी CRMS च्या आंदोलनामुळे मोटरमन आणि गार्ड लॉबीचा प्रवेशद्वार अडवला गेला. त्यामुळे आत असलेले मोटरमन-गार्ड बाहेर येऊ शकले नाहीत आणि जे बाहेर होते ते लॉबीमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. परिणामी स्थानकात प्रचंड गर्दी झाली आणि लोकल गाड्या उशिराने धावू लागल्या. याच धांदलीत CSMT कडे जाणाऱ्या लोकलमधून उतरलेल्या चार प्रवाशांनी सॅण्डहर्स्ट रोड परिसरात रुळांवर उडी घेतली. दुर्दैवाने मागून येणाऱ्या लोकलने त्यांना धडक दिली आणि दोघांचा मृत्यू झाला.

या सर्व घडामोडींमुळे मध्य रेल्वेच्या सेवांवर पुन्हा परिणाम होण्याची शक्यता आहे. CRMS चा ‘नियमानुसार काम’ इशारा प्रत्यक्षात आला तर लोकलची गती कमी होणे, वेळापत्रक बिघडणे आणि मोठ्या प्रमाणावर उशीर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे रोजच्या प्रवासावर अवलंबून असलेल्या मुंबईकरांमध्ये पुन्हा  चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


-----------------------------------------------------------------------------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने