मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये मोठे बदल करण्यात येत असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून महिलांना ई-केवायसी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. कधी सर्व्हर डाऊन, कधी ओटीपी न मिळणे अशा तांत्रिक समस्यांमुळे लाभार्थींना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यावर उपाय म्हणून वेबसाईटमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा सुरू असल्याचे तटकरेंनी सांगितले.
मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, “लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर काही महत्त्वाचे बदल सुरू आहेत. विशेषतः ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत, अशा महिलांसाठी वेगळा पर्याय वेबसाईटवर जोडला जाणार आहे. त्यामुळे काही वेळ लागू शकतो, पण ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. कोणतीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देणाऱ्या या योजनेचा 16 वा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबरपर्यंत जमा झाला होता, तर दिवाळीपूर्वी नवा हप्ता जमा होण्याची अपेक्षा होती. मात्र ई-केवायसी प्रक्रियेमुळे तो काही दिवस विलंबित झाला आहे.
अदिती तटकरेंनी सांगितले की, “अजितदादांनी 24 तासांत स्पष्टीकरण दिलं आहे. विरोधक जो तो आपलं मत व्यक्त करत असतो, पण योजनेबाबत कोणताही गोंधळ नाही. योजना नियमित सुरू आहे.” तटकरेंनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वादही घेतल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून या योजनेवर विरोधक सतत टीका करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना सरकारने योजनेतील पारदर्शकतेवर भर देत सर्व तांत्रिक त्रुटी दूर करण्याची हमी दिली आहे.
दरम्यान, ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली असून, ई-केवायसी पूर्ण न केल्यास पुढील हप्ता जमा होणार नाही, अशी सूचना शासनाने दिली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
