‘बूट लपवण्या’च्या प्रथेवर भडकला नवरदेव; हार, अंगठी फेकत घातला गोंधळ, वधूने तोडले लग्न !


दिल्ली : एका विवाह सोहळ्यात ‘बूट लपवण्या’च्या पारंपरिक प्रथे वरून मोठा वाद निर्माण झाला. या दरम्यान नवरदेव संतापला आणि त्याने वधूपक्षाशी गैरवर्तन केले. वराच्या वर्तणुकीमुळे नाराज झालेल्या वधूने तत्काळ लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे विवाहस्थळी गोंधळ उडाला आणि अखेरीस वर मंडप सोडून नंगेपाय परतला.

ही घटना नुकतीच उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील सुरीर भागात घडली. सहपऊ येथून आलेल्या वराच्या बारातीत सर्व काही सुरळीत सुरू होते. रात्रभोजनानंतर पारंपरिक ‘बूट लपवण्या’ची मजेदार प्रथा सुरू झाली. पण या वेळी वराने संताप व्यक्त करत वधूपक्षावर आरोप केले. त्याच्या अयोग्य वर्तणुकीने संतप्त झालेल्या वधूने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.

वधूपक्षातील नातेवाईकांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र वर आणि त्याचे नातेवाईक आक्रमकच राहिले. या दरम्यान वराने वरमाला आणि अंगठी काढून फेकून दिली आणि संतापाच्या भरात जूते-चप्पल न घालता निघून गेला.

घटनेनंतर वधूपक्षानेही मुलीचा निर्णय मान्य केला आणि लग्न न करण्याचा निर्णय कायम ठेवला. काही वेळानंतर दोन्ही पक्षातील ज्येष्ठांनी हस्तक्षेप करून तडजोड घडवून आणली. समेटाच्या भाग म्हणून वरपक्षाने वधूपक्षाला लग्नाचा पूर्ण खर्च परत केला. त्यानंतर प्रकरण शांत झाले आणि वर बारातीसह रिकाम्या हाताने परतला.


    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने