नवी दिल्ली : भोंदूगिरीच्या माध्यमातून आयटी इंजिनियर आणि त्याच्या शिक्षक पत्नीला पुण्यात 14 कोटी रुपयांनी फसवल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे.
देशभरातील श्रद्धाळू लोकांचा धार्मिक विश्वास आणि अंधश्रद्धेचा गैरवापर करून भोंदू बाबांचा धंदा वारंवार समोर येत आला आहे.
महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत स्वयंघोषित भोंदू बाबा म्हणजे 'गॉडमॅन'नी लोकांना “दैवी शक्ती”, “अदृश्य उपचार”, “भविष्य बदलण्याची क्षमता” अशा आमिषांनी लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.
पुण्यात नुकत्याच उघड झालेल्या १४ कोटी रुपयांच्या भोंदू बाबाच्या प्रकरणानंतर, ठाणे, दिल्ली, आग्रा आणि तेलंगणामधील अशाच प्रकारच्या घोटाळ्यांनी धार्मिक आडोशातील काळी बाजू उघड केली आहे.
ठाण्यातील सुषिलकुमार पाटिदास उर्फ आयोध्याप्रसाद गिरी याने एका अभियंत्याच्या कुटुंबाला “दुष्ट आत्मा दूर करतो” असा दावा करून पैसे आणि सोन्याचे दागिने मिळवले. गेल्या सात वर्षांपासून तो विविध कुटुंबांकडून अशा पद्धतीने पैसे उकळत होता. ठाणे पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील शेख अहमद या भोंदू बाबाने आजार बरे करतो सांगत स्थानिकांकडून पैसे घेतले. त्याच्याकडे कोणतेही वैद्यकीय शिक्षण किंवा प्रमाणपत्र नसताना तो “दैवी उपचार” देत होता. पोलिसांनी त्यालाही अटक केली असून, नागरिकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दिल्ली आणि आग्रा परिसरात कार्यरत असलेला स्वामी चैतन्यानंद सरस्वती याच्या विरोधात तब्बल १७ महिलांनी लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. या भोंदू बाबाने स्वतःला “युएन प्रतिनिधी” आणि “ब्रिक्स दूत” असल्याचे बनावट कार्ड दाखवून अनेक श्रीमंत भक्तांची दिशाभूल केली. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी सुरू केली आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे हर्षवर्धन जैन या व्यक्तीने ‘Westarctica’ नावाच्या काल्पनिक राष्ट्राचा दूत असल्याचा दावा करून बनावट दूतावास सुरू केला होता. त्याने गॉडमन, शस्त्रव्यापारी आणि उद्योगपतींशी संबंध ठेवून तब्बल ३०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
या सर्व घटनांमधून एक समान धागा स्पष्ट दिसतो श्रद्धेचा गैरवापर. आजारी माणसाचे, आर्थिक संकटात सापडलेल्या व्यक्तीचे, किंवा धार्मिक भावनेने भारावलेल्या भक्तांचे मन जिंकून भोंदू बाबा पैसे, जमीन, दागिने, आणि अनेकदा मानवी संबंधही लुटतात.
तज्ञांच्या मते, भारतात अशा फसवणुकींचे प्रमाण वाढत चालले आहे कारण अनेक वेळा लोक भीती, आजार किंवा भविष्याची अनिश्चितता यामुळे या तथाकथित “दैवी शक्तीं”कडे वळतात. कायद्याने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी अलीकडेच “भोंदू बाबा विरोधी विशेष मोहीम” सुरू केली असून धार्मिक उपचाराच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत
भारतामध्ये श्रद्धा आणि अध्यात्म यांना सामाजिक व सांस्कृतिक स्थान असले तरी, त्याचाच गैरवापर करून काहीजणांनी बनावट देवपणाचा खेळ सुरू केला आहे. त्यामुळे जनतेने विवेकाने विचार करून अशा गॉडमनपासून दूर राहणे, हीच खरी जागृती ठरणार आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
