वसंतदादा शुगर'ची चौकशी सहकार क्षेत्रात वादळ

 

अजित दादां टार्गेट आहेत का? रोहित पवारांचा सवाल

Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा वापर ठरलेल्या उद्देशासाठीच झाला का, याची चौकशी साखर आयुक्तांकडून दोन महिन्यांत करण्यात येणार आहे. मात्र अशी कुठलीही चौकशी लावण्यात आलेली नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

या चौकशीत अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील आणि जयप्रकाश दांडेगावकर हे सुद्धा संस्थेच्या नियामक मंडळावर असल्याने, राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चांना उधाण आले आहे.

या कारवाईवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले “आम्ही सरकारसमोर अनेक उदाहरणं, पुरावे ठेवले आहेत. पण त्या प्रकरणांवर काहीच चौकशी होत नाही. उलट व्हीएसआयसारख्या संस्थेवर, ज्यांनी महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं, तेथे चौकशीचा बडगा उगारला जातोय.”

रोहित पवार पुढे म्हणाले, “व्हीएसआय म्हणजे सहकार क्षेत्राचा कणा आहे. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने शेती आणि साखर उद्योगात उत्कृष्ट काम केले आहे. अजितदादांचा या व्यवस्थेत फार मोठा वाटा आहे. पक्षभेद बाजूला ठेवून सर्वच पक्षांचे लोक इथे काम करतात.”

रोहित पवारांनी भाजपवर थेट आरोप करत म्हटलं “काल अमित शाह म्हणाले, आम्हाला कुबड्यांची गरज नाही. आधी ठाण्याला टार्गेट करण्यात आलं, आता अजितदादा व्हीएसआयमध्ये आहेत म्हणून भाजपचा मोर्चा बारामतीकडे वळला की काय? हे सगळं हास्यास्पद आहे.”

त्यांनी पुढे म्हटलं “खऱ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर चौकशी न लावता अशा संस्थांना लक्ष्य करतात. ही ‘वापरा आणि फेकून द्या’ वृत्ती आहे. येणाऱ्या काळात अजितदादा आणि शिंदे यांच्याकडे ना लोक राहतील, ना पक्ष!”

रोहित पवार म्हणाले, “पंतप्रधान मोदी स्वतः व्हीएसआयच्या कार्यक्रमाला आले होते. पंतप्रधान कार्यालयाने संस्थेचा सखोल अभ्यास केल्यानंतरच ते आले होते. मग आता या लोकांना या संस्थेबद्दल पोटदुखी का झाली, हे समजत नाही.

या प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ची अशी कोणतीही चौकशी लावण्यात आलेली नाही. साखर उत्पादकांच्या निधीचा योग्य वापर झाल्या आहे का यासंदर्भात माहिती मागवली आहे असे स्पष्टीकरण दिले आहे.


Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने