महिला डॉक्टर आत्महत्य प्रकरणाला नवे वळण!
फलटण : महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने केवळ पोलिस तपासापुरते मर्यादित न राहता राज्यातील राजकारण, प्रशासन आणि विविध संघटना यांना एकाच वेळी चांगलेच हालचाल करायला भाग पाडले आहे. प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली. मृत डॉक्टरच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये थेट दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावे नमूद असल्यामुळे केवळ प्रशासनावरच नाही, तर सत्ताधाऱ्यांवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर यांच्यावर वारंवार अत्याचार आणि छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला. “पोलिसांवरच आरोप असतील, तर तपास निष्पक्ष कसा होणार?” असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, सरकारकडून आणि प्रशासनाकडून हे आरोप “तपास चालू आहे, निष्कर्ष निघालेला नाही” अशा शब्दांत नाकारले गेले.
दरम्यान, तपास सुरू असताना अनेक नवीन दावे समोर आले आहेत. मृत डॉक्टरचा मोबाईल 3 वाजेपर्यंत सील करण्यात आला होता, मात्र व्हॉट्सअॅपचा शेवटचा लास्ट सीन 11 वाजून 13 मिनिटांचा दिसतो, असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे मृत्यूनंतर मोबाईल वापरण्यात आला का, फिंगर लॉक वापरून पुरावे डिलीट करण्यात आले का, यावरही आता संशय व्यक्त केला जात आहे. कुटुंबीयांनी “आमच्या मुलीने आत्महत्या केली नाही, तर तिची हत्या करण्यात आली आहे” असा थेट आरोप केला आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, राज्य महिला आयोग आणि काही अधिकाऱ्यांकडून मृत डॉक्टरच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केल्याच्या आरोपांमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. कुटुंबीयांनी या वृत्तीवर तीव्र आक्षेप घेत “तपासाऐवजी आमच्या मुलीच्या चारित्र्यावर संशय का व्यक्त केला जातोय?” असा थेट सवाल केला आहे.
कुटुंबीयांच्या मते, “मुलीने अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत होती, पण तपासाचा फोकस सत्य शोधण्याऐवजी तिच्या वर्तनावर का केंद्रित केला जातोय?” या भावनिक प्रश्नामुळे प्रशासनावरील अविश्वास अधिक गंभीर होताना दिसत आहे.
विरोधकांनीही या मुद्यावर सरकारवर टीका केली आहे. “महिला डॉक्टरच्या मृत्यूच्या प्रकरणात आरोपी पोलीसच आहेत, त्यामुळे तपास स्वतंत्र यंत्रणेकडून व्हायला हवा,” अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सरकारकडून तपासावर कोणताही दबाव नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे, मात्र विविध संस्था आणि संघटनांनी या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सुसाईड नोट, पुरावे, मोबाईल लॉक, आणि राजकीय हस्तक्षेप या सर्व घटकांनी फलटण डॉक्टर प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनवले आहे. या प्रकरणाचा शेवट “आत्महत्या की हत्या?” या प्रश्नाने नव्हे, तर “सत्याचा शोध लागेल का?” या मोठ्या प्रश्नानेच होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
