आरबीआयनं जाहीर केली संपूर्ण सुट्टीची यादी
फेब्रुवारी महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी असेल, कोणत्या तारखांना बँका बंद राहतील आणि कोणत्या सेवा सुरू राहणार, याची सविस्तर माहिती.
Bank Holidays February 2026 संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात तुम्ही बँकेतील कामांचे नियोजन करत असाल, तर या महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी आहे, हे आधीच जाणून घेणे आवश्यक ठरणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फेब्रुवारी 2026 साठी बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली असून, यात साप्ताहिक सुट्ट्या, दुसरा आणि चौथा शनिवार तसेच विविध राज्यांतील स्थानिक सणांमुळे असलेल्या सुट्ट्यांचा समावेश आहे.
फेब्रुवारी महिन्यात रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार या दिवशी नेहमीप्रमाणे देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत. या नियमानुसार 1 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील. 14 फेब्रुवारी हा दुसरा शनिवार असल्यामुळे या दिवशीही बँकिंग व्यवहार होणार नाहीत. 15 फेब्रुवारी आणि 22 फेब्रुवारी हे दोन्ही रविवार असल्याने या दिवशीही बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. तसेच 28 फेब्रुवारी हा चौथा शनिवार असल्यामुळे त्या दिवशी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
याशिवाय फेब्रुवारी महिन्यात विविध राज्यांमध्ये स्थानिक सणांमुळे अतिरिक्त सुट्ट्या असणार आहेत. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी होत असून, हा दिवस रविवार असल्यामुळे या सणानिमित्त असलेली सुट्टी आपोआपच देशभर लागू होणार आहे.
राज्यनिहाय सुट्ट्यांमध्ये 18 फेब्रुवारी रोजी सिक्किममध्ये लोसार सणानिमित्त बँकांना सुट्टी असेल. 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बँका बंद राहणार आहेत. तसेच 20 फेब्रुवारी रोजी अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम राज्य स्थापना दिनानिमित्त त्या राज्यांतील बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, बँकांच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना सर्वच सेवा बंद राहणार नाहीत. ऑनलाईन बँकिंग सेवा सुरू राहणार असून, यूपीआय, मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येतील. एटीएममधून पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध असेल. मात्र, चेक क्लिअरन्स, डिमांड ड्राफ्ट, लॉकरसंबंधी कामे तसेच ज्या सेवा प्रत्यक्ष बँक शाखेत जाऊनच कराव्या लागतात, त्या सुट्टीच्या दिवशी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे बँक ग्राहकांनी फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांचे वेळापत्रक पाहूनच बँकेतील महत्त्वाची कामे नियोजित करावीत, असा सल्ला देण्यात येत आहे.
------
