विमान अपघातात देशाने गमावले बडे नेते ! माजी लोकसभाअध्यक्षांसह सात दिग्गजांचा दुर्दैवी अंत

 


मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला असून, गेल्या सात महिन्यांतील ही दुसरी मोठी राजकीय दुर्घटना ठरली आहे. जून २०२५ मध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे विमान अपघातात निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर भारताच्या राजकीय इतिहासात विमान किंवा हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नेत्यांची पुन्हा आठवण काढली जात आहे. आतापर्यंत देशाने अशा दुर्घटनांमध्ये सात प्रमुख नेते गमावले असून, त्यापैकी तिघांनी मुख्यमंत्रीपद भूषवले होते.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री बलवंतराय मेहता हे विमान अपघातात मृत्यू पावणारे देशातील पहिले मोठे राजकीय नेते मानले जातात. १९६३ ते १९६५ या काळात त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवले. १९६५ च्या भारत-पाक युद्धादरम्यान कच्छच्या रणात पाहणीसाठी उड्डाण करत असताना पाकिस्तानने त्यांचे विमान पाडले. या दुर्घटनेत बलवंतराय मेहता, त्यांची पत्नी, तीन कर्मचारी, एक पत्रकार आणि दोन क्रू सदस्यांचा मृत्यू झाला.

काँग्रेसचे तत्कालीन खासदार संजय गांधी यांचा २३ जून १९८० रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. दिल्लीमध्ये सकाळी विमान उडवत असताना स्टंट दाखवण्याच्या प्रयत्नात त्यांचे विमान कोसळले. या अपघातात संजय गांधी यांच्यासह सहप्रवासी सुभाष सक्सेना यांचाही मृत्यू झाला. या घटनेने त्या काळात संपूर्ण देश हादरला होता.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव सिंधिया यांचाही मृत्यू विमान अपघातात झाला. ३० सप्टेंबर २००१ रोजी ते कानपूरमधील एका सभेसाठी जात असताना मैनपुरीजवळ मोटागाव परिसरात त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेत सिंधिया यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांचे वय ५६ वर्षे होते.

लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष गंती मोहना चंद्र बालयोगी यांचा २००२ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या अपघातात त्यांचे सुरक्षा अधिकारी डी. सत्य राजू आणि पायलट कॅप्टन जी. व्ही. मेनन यांचाही मृत्यू झाला. पदावर असताना निधन झालेले ते पहिले लोकसभा अध्यक्ष ठरले होते.

सप्टेंबर २००९ मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. राजशेखर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. नल्लामाला जंगलातून प्रवास करत असताना त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. काही माध्यमांनी नक्षलवादी हल्ल्याचा दावा केला होता, मात्र तो सरकारने फेटाळला होता. रेड्डी यांच्या निधनाने आंध्र प्रदेशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती.

१२ जून २०२५ रोजी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचे विमान क्रॅश झाले होते. संध्याकाळी जाहीर झालेल्या मृतकांच्या यादीत रुपाणी यांचे नाव समोर आले. ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी लंडनला जात होते.

२०११ मध्ये अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री डोरजी खांडू यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. तवांगहून राजधानी इटानगरकडे जात असताना त्यांचे विमान बेपत्ता झाले आणि नंतर अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आले. या दुर्घटनेत खांडू यांच्यासह इतर सहप्रवाशांचाही मृत्यू झाला. तेव्हा त्यांचे वय ५६ वर्षे होते.

या यादीत आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश झाला आहे. बारामती येथे झालेल्या विमान अपघाताने देशाने आणखी एक अनुभवी, प्रभावी आणि धडाडीचे राजकीय नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सातत्याने विकास आणि प्रशासनात सक्रिय असलेल्या या नेत्यांच्या अकाली जाण्याने भारतीय राजकारणाला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.

____________________________





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने