लफड्यावाल्यांची’ पंचाईत! CNAP फीचर लवकरच सुरू होणार
मुंबई : फोनवरील फसवेगिरी आणि स्पॅम कॉल्सना आळा बसवण्यासाठी सरकार मोठं पाऊल उचललं आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) आणि दूरसंचार विभाग (DoT) यांनी Calling Name Presentation (CNAP) ही नवी सेवा देशभर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे आता मोबाईलवर कोणाचाही कॉल आल्यावर त्या नंबरसोबत त्या व्यक्तीचं खरं नावही स्क्रीनवर दिसणार आहे. म्हणजेच, कॉलरचा खोटारडेपणा आता लपवता येणार नाही! फसवणूक करणाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे, तर नागरिकांना अनोळखी कॉल्सची खरी ओळख पटवणं सोपं होणार आहे.
CNAP म्हणजे Calling Name Presentation Service.या फीचरअंतर्गत, कॉल करताना ज्या नावावर सिम कार्ड नोंदवलेले आहे ते नाव समोरच्या व्यक्तीच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल. म्हणजेच, तुम्ही मोबाईलमध्ये ‘पप्पू’, ‘राजा’ किंवा ‘Boss’ अशा नावाने सेव्ह केले असलं तरी स्क्रीनवर खरं नावच झळकणार!
या फीचरमुळे फसवणुकीच्या आणि स्पॅम कॉल्सची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. सामान्य युजर्सना सुरक्षितता आणि पारदर्शकता मिळेल. पण काही जणांसाठी, विशेषतः लफडेबाज आणि खोट्या नावाने वावर करणाऱ्यांसाठी ही सेवा डोकेदुखी ठरणार आहे.
DoT ने सर्व टेलिकॉम कंपन्यांना CNAP सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. सुरुवातीला ही सेवा 4G आणि त्यावर आधारित नेटवर्क्सवर उपलब्ध होईल. 2G आणि 3G नेटवर्कमध्ये तांत्रिक अडचणींमुळे ही सुविधा नसेल.
सध्या मुंबई आणि हरियाणा सर्कलमध्ये या सेवेचे ट्रायल रन यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. आता हा पायलट प्रकल्प 60 दिवस चालवण्यात येणार असून, त्यानंतर तो देशभर लागू केला जाईल.
DoT ने सांगितले आहे की, ही सेवा डिफॉल्टने सुरू होईल, परंतु जर कोणाला CNAP फीचर वापरायचं नसेल, तर ते युजर्स ही सुविधा डीऍक्टिव्हेट करू शकतील. म्हणजेच, त्या व्यक्तीच्या मोबाईलवर कॉलरचं नाव दिसणार नाही.
TRAI आणि DoT यांचे हे पाऊल डिजिटल सुरक्षा वाढवणे, फसवणूक रोखणे आणि पारदर्शकता निर्माण करणे या उद्देशाने उचलले आहे.
