Microsoft सोबत नवी डील, दोन्ही कंपन्यांसाठी ‘विन-विन’ करार
नवी दिल्ली: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) जगात मोठा भूकंप घडला आहे. OpenAI आणि Microsoft यांच्यात पुन्हा एक मोठा करार (Deal) झाला असून, या नव्या करारानंतर OpenAI ची एकूण किंमत तब्बल $500 अब्ज डॉलर (₹42 लाख कोटी रुपये) इतकी झाली आहे. या डीलमुळे OpenAI ला आपल्या कंपनीच्या स्ट्रक्चरमध्ये बदल करून नवीन फंडिंग मिळवणे आणि विकास वेगाने पुढे नेणे शक्य होणार आहे.
2019 मध्ये झालेल्या जुन्या करारामुळे OpenAI वर Microsoft ची मोठी अवलंबित्व होती. त्या वेळी Microsoft ने OpenAI ला आपली Azure Cloud Service वापरण्याची परवानगी दिली होती, पण त्यामुळे कंपनीला बाहेरून भांडवल उभारणे मर्यादित झाले होते. मात्र, ChatGPTच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर OpenAI ला वाढत्या यूजर्स आणि डेटा प्रोसेसिंगसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणि क्लाउड क्षमतेची गरज भासू लागली.
नव्या करारानंतर आता OpenAI ला नवीन गुंतवणूकदारांकडून भांडवल उभारणे सोपे होणार आहे. या डीलमुळे कंपनी अधिक स्वायत्तपणे निर्णय घेऊ शकेल.
OpenAI आता स्वतःला Public Benefit Corporation (PBC) म्हणून पुनर्रचना करत आहे. म्हणजेच कंपनी नफा कमावतानाच आपल्या सामाजिक उद्दिष्टांनाही प्राधान्य देईल. या नव्या स्ट्रक्चरमध्येही Microsoft हा सर्वात मोठा गुंतवणूकदार राहणार आहे त्यांचा OpenAI Group PBC मध्ये 27% हिस्सा आहे, ज्याची किंमत सुमारे $135 अब्ज डॉलर इतकी आहे.
OpenAI फाउंडेशनचे चेअरमन यांनी सांगितले की, “या करारामुळे कंपनीची रचना अधिक सोपी आणि स्पष्ट झाली आहे. नॉन-प्रॉफिट संघटना आता फॉर-प्रॉफिट विभागाचे नियंत्रण ठेवेल, आणि AGI (Artificial General Intelligence) च्या दिशेने जाण्यासाठी कंपनीला अधिक संसाधनं थेट उपलब्ध होतील.”
या डीलचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे OpenAI आपल्या AI मॉडेल्ससाठी Microsoft च्या Azure क्लाउड प्लॅटफॉर्मचा अधिक वापर करणार आहे. या संदर्भात दोन्ही कंपन्यांमध्ये अब्जावधी डॉलर्सचा क्लाउड कॉन्ट्रॅक्ट साइन करण्यात आला आहे.
Microsoft च्या माहितीनुसार, OpenAI आता Azure कडून $250 अब्ज डॉलरच्या सेवा घेईल. मात्र या वेळी Microsoft ला “Right of First Refusal” मिळणार नाही म्हणजे भविष्यात OpenAI इतर क्लाउड सर्व्हिसेसकडेही वळू शकते.
या डीलमुळे OpenAI कडे आता प्रचंड भांडवल आणि Microsoft ची टेक्निकल सपोर्ट दोन्ही मिळणार आहेत. त्यामुळे AI च्या क्षेत्रात नवीन मॉडेल्स, साधने आणि अपडेट्स आणखी वेगाने येतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
दुसरीकडे Microsoft च्या Azure क्लाउड प्लॅटफॉर्मला यामुळे मोठी गती मिळेल. त्यामुळे कंपनीची स्थिती Google Cloud आणि Amazon Web Services (AWS) यांच्याशी स्पर्धा करण्यास आणखी मजबूत होईल.
या नव्या स्ट्रक्चरनंतर मार्केटमध्ये चर्चा आहे की, OpenAI लवकरच IPO (Initial Public Offering) आणू शकते. मात्र कंपनीकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
