पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना सलोख्याचा प्रस्ताव

 म्हणाल्या “आपल्या समाजांमधील दरी मिटवूया”

परळी : दिवाळी निमित्त आयोजित स्नेह मिलन कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे यांच्याशी सलोखा साधण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, “मी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात कधीही बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास करण्यात आला. जरांगे पाटील पुन्हा उपोषण करणार असतील, तरी मी पालकमंत्री म्हणून भेटायला तयार आहे.”

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी कायद्याच्या चौकटीबाहेर जाणार नाही. आपल्या समाजांमधील दरी मिटवूयात. जे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिमत्त्व होतं, तेच माझंही आहे. माझ्या जातीचा असला, तरी चुकीच्या भूमिकेला मी कधीही पाठिंबा देणार नाही.”

कार्यक्रमात त्यांनी आपल्या पराभवानंतरही घेतलेली भूमिका आणि आगामी राजकीय दिशा स्पष्ट केली. “लोकसभा निवडणुकीत मी थोडक्यात हरले, पण मी एकमेव विधान परिषदेची आमदार आहे, जी मंत्रिमंडळात आहे. काहींनी माझ्या पराभवानंतर आत्महत्या केल्या, पण मी अजूनही उभी आहे आणि नव्या उमेदीने काम करतेय,” असं त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, “मी दररोज ४०० लोकांना भेटते. मी तुमच्या फक्त सुखात नाही, तर दुःखातही सोबत आहे. संघर्षातही तुमच्या बरोबर आहे. निवडणुकीत वज्रमूठ करा. अजित पवार यांच्याबरोबर युतीची चर्चा झाली आहे, पण काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही. इतर ठिकाणच्या उमेदवारांसाठी माझ्याकडे येऊ नका, फक्त काम करा.”

या वक्तव्यातून पंकजा मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी समाजांमधील दरी कमी करण्याचा स्पष्ट संदेश दिला असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भूमिका राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरते आहे.



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने