बलात्काराच्या आरोपीला चप्पलांची माळ घालून फिरवत ठार केले

हत्या तसेच बलात्काराच्या परस्परविरोधी तक्रारी

झारखंड | झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात मानवीतेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. गावकऱ्यांनी 56 वर्षीय व्यक्तीवर मानसिकदृष्ट्या आजारी महिलेसोबत बलात्कार केल्याचा आरोप करून त्याला चप्पलांची माळ घालून गावभर फिरवलं आणि निर्दयपणे मारहाण केली. अखेरीस त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

ही घटना पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील देवमबीर गावात शुक्रवारी रात्री घडली. मृत व्यक्तीची ओळख सायमन तिर्की अशी आहे. तो रात्री उशिरा शौचासाठी बाहेर गेला असताना काही ग्रामस्थांनी त्याला पकडलं. त्यानंतर त्याच्यावर मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या एका महिलेसोबत बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी त्याला चप्पलांची माळ घालून, उघडाच गावभर फिरवलं आणि नंतर एका खोलीत बंद करून निर्दयपणे मारहाण केली.

पोलिसांनी सांगितले की, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा खोलीचं दार उघडलं, तेव्हा सायमन तिर्की मृत अवस्थेत आढळला. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन चाईबासा येथील सदर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत व्यक्तीवर गावातील मानसिकदृष्ट्या आजारी महिलेसोबत बलात्काराचा आरोप होता, त्यामुळे गावकऱ्यांत तीव्र संताप पसरला होता.

सोनुआ पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी शशिबाला भेंगरा यांनी माध्यमांना सांगितले की, “ही घटना सोनुआ पोलिस ठाण्याच्या टेपसाई टोला भागात घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.”

चक्रधरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम प्रकाश यांनी सांगितले की, या घटनेत सहभागी असलेल्या दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. मृतकाच्या कुटुंबाने हत्या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे, तर मानसिकदृष्ट्या आजारी महिलेच्या कुटुंबाने बलात्काराची तक्रार दिली आहे. पोलिस दोन्ही तक्रारींचा समांतर तपास करत आहेत.

गावात तणावपूर्ण वातावरण असल्याने अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस तपासत आहेत की, जमावाला कोणी उद्दीप्त केले होते का किंवा हा प्रकार पूर्णतः संतापातून घडला. याचा तपास सुरू आहे.




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने