२०२९ पर्यंत मुख्यमंत्रिपदावर मीच, शिंदेंना अप्रत्यक्ष संदेश?
फडणवीसांचा दिल्ली संदर्भातील चर्चांना पूर्णविराम
मुंबई : राज्याच्या सत्तेच्या राजकारणात पुन्हा हलकल्लोळ निर्माण करणाऱ्या दिल्लीतील चर्चांना अखेर पूर्णविराम देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मी कुठेही जात नाही, आणि मुख्यमंत्रिपदासाठी २०२९ पर्यंत कोणतीही व्हॅकेन्सी नाही,” असं सांगून फडणवीस यांनी थेट आणि ठामपणे जाहीर केलं आहे की तेच पुढील चार वर्षे महाराष्ट्राच्या गादीवर कायम राहणार आहेत.
फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पा मारताना बोलत होते. काही दिवसांपासून फडणवीस दिल्लीला जाऊन पक्षाध्यक्ष किंवा कॅबिनेट मंत्री होतील, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, या सर्व तर्कवितर्कांना त्यांनी एका वाक्यात पूर्णविराम दिला. “मी कुठेही जात नाही,” या वाक्यानेच त्यांनी महाराष्ट्रातील सत्तेच्या समीकरणांना नवा ट्विस्ट दिला आहे.
राजकीय वर्तुळात याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीचा अप्रत्यक्ष ‘मेसेज’ म्हणून पाहिलं जात आहे. कारण सध्या शिंदे आपल्या निकटवर्तीयांना “मी पुन्हा येईन” असं सांगत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मंत्रालयातील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी देखील शिंदे यांच्या या आत्मविश्वासपूर्ण वक्तव्यांची पुष्टी खासगीत केल्याची चर्चा आहे. त्यामुळेच फडणवीसांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील काही दिवसांत सातत्याने दिल्लीत वाऱ्या करत आहेत. आजही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय हालचालींचं वर्तुळ पुन्हा सक्रिय झालं. परंतु फडणवीसांनी “२०२९ पर्यंत मुख्यमंत्रिपदासाठी व्हॅकेन्सी नाही,” असं ठाम सांगून शिंदेंच्या सर्व शक्यतांना आळा घातल्याचं मानलं जात आहे.
फडणवीस यांना २०१४ मध्येच संघ आणि दिल्ली नेतृत्वाचा ठोस पाठिंबा मिळाला होता. त्याचवेळी तत्कालीन वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा मुख्यमंत्रीपदाचा ‘क्लियर ऑर्डर’ दिल्लीकडून आला असतानाही संघाच्या पाठिंब्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री बनले. त्या वेळी खडसे यांच्या हातातोंडाशी आलेला घास संघानेच काढून घेतला. असा दावा काहीजण करतात. तर आता त्याच पद्धतीने ‘दुसरे एकनाथ’ म्हणजे एकनाथ शिंदे फडणवीसांशी संघर्ष करत असल्याचं चित्र राजकीय वर्तुळात आणि अंतर्गत चर्चेत रंगत आहे.
एकनाथ शिंदे हे खासगीत म्हणतात की, “मला २०२२ ते २०२९ पर्यंत मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला गेला होता.” परंतु आज फडणवीसांनी स्वतः २०२९ पर्यंत पदावर राहण्याचं विधान करून शिंदेंच्या या दाव्यालाच आव्हान दिलं आहे. २०२४ मध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेसाठी विलंब झाला, त्यामागे हाच ‘मुख्यमंत्रीपदाचा वाद’ होता, असा अप्रत्यक्ष संकेत फडणवीसांच्या वर्तुळातून दिला जातो.
राजकीय जाणकारांच्या मते, “फडणवीस हे दिल्लीतील नेतृत्वावर विश्वास ठेवणारे आणि संघाच्या शिस्तीत राहणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी केलेलं हे विधान म्हणजे फक्त अफवांचा प्रतिकार नव्हे, तर येत्या निवडणुकीसाठीचा ‘नेतृत्वाचा ठसा’ आहे.”
अर्थात, महाराष्ट्रात सत्तेचा खेळ नेहमीच बहुपदरी राहिला आहे. पण या विधानाने फडणवीसांनी सध्याच्या सत्तासमीकरणात एक गोष्ट स्पष्ट केली आहे, ती म्हणजे
‘मी कुठेही जात नाही, आणि ही म्हणजे मुख्यमंत्री पदाची खुर्ची २०२९ पर्यंत कोणाकडेही जाणार नाही !’
