महिला अधिकाऱ्यांमध्ये उडाल्या थेट खुर्ची युद्धाच्या ठिणग्या

 नितीन गडकरींच्या कार्यक्रमात रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा!

नागपूर : सरकारी खुर्च्या या नेहमीच दिसायला साध्या, पण त्यावर बसायचा प्रश्न आला की ठिणग्या उडतातच. अशाच ठिणग्यांनी नागपूरमध्ये अक्षरशः “स्पार्क” घेतला आणि रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा! डाक विभागाच्या दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमध्ये ‘अधिकार’ आणि ‘खुर्ची’च्या वादावरून असा संघर्ष झाला की, थेट नेमप्लेट काढणे, साडीवर पाणी उडवणे आणि चिमटे घेण्यापर्यंत गोष्ट पोहोचली. विशेष म्हणजे हा प्रकार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत घडला.

हा प्रकार नागपूरमध्ये झालेल्या १७ व्या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनावेळी घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात ऑनलाइन उद्घाटन सुरू असताना नागपूरच्या सभागृहात मात्र दोन महिला अधिकारी ‘ऑफलाइन युद्धात’ उतरल्या होत्या. या दोघी अधिकारी म्हणजे पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे आणि प्रभारी अधिकारी सुचिता जोशी.

मिळालेल्या माहितीनुसार, शोभा मधाळे यांची दुसऱ्या राज्यात बदली झाली होती, मात्र त्यांनी न्यायालयातून त्या बदलीच्या आदेशावर स्थगनादेश मिळवला होता. दरम्यान, त्यांच्या जागी सुचिता जोशी यांना प्रभारी म्हणून नेमण्यात आलं होतं. त्यामुळे कार्यक्रमात दोघीही स्वतःला मुख्य यजमान समजू लागल्या आणि याच ‘खुर्ची’वरून वाद पेटला.

स्टेजवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसाठी एक खुर्ची आणि उर्वरित दोन खुर्च्या या दोन्ही अधिकाऱ्यांसाठी ठेवण्यात आल्या होत्या. प्रभारी अधिकाऱ्यांच्या नावाची नेमप्लेट ठेवली गेली होती, पण बदली झालेल्या शोभा मधाळे यांनी “ही माझी खुर्ची आहे!” असं म्हणत ती नेमप्लेट काढून टाकली. त्यानंतर दोघींत शाब्दिक चकमक झाली आणि एकीने दुसरीच्या साडीवर पाणी उडवलं, तर दुसरीने चिमटे घेऊन हुसकावण्याचा प्रयत्न केला. उपस्थित अधिकारी वर्ग या दृश्याने स्तब्ध झाला.

कार्यक्रमाचे वातावरण पूर्णतः तणावपूर्ण झाले असताना नितीन गडकरी यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती सावरली. त्यांनी शांतपणे प्रभारी अधिकाऱ्याला आपल्या बाजूला बसवून घेतले आणि कार्यक्रम पुढे सुरू ठेवला. यानंतर सभागृहातील ‘खुर्ची नाट्या’वरील पडदा पडला, मात्र चर्चेची ठिणगी संपूर्ण डाक विभागभर पसरली.

या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला असून, नागपूरमधील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये याच चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांनी “हा अधिकारपदाचा स्त्री-हट्ट होता का अहंकाराचा खेळ?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार प्रभारी अधिकारी कार्यक्रमाचा संपूर्ण अहवाल आणि खर्चाचा तपशील तयार करत आहेत आणि या घटनेची औपचारिक तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे. ही घटना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसमोर घडल्याने या प्रकरणाचा ‘डॅमेज रिपोर्ट’ थेट दिल्लीपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने