रवींद्र धंगेकर यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, धरणे आंदोलनाची घोषणा
पुणे : पुण्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्राद्वारे पुण्यातील जैन बोर्डिंगचा बेकायदा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली असून, 27 ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे.
रवींद्र धंगेकर यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, “तमाम पुणेकरांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करत आहे की जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा आणि या प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी. या व्यवहाराच्या चौकशीदरम्यान केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांच्या प्रभावाखालीच हा गैरव्यवहार घडल्याचा ठोस पुरावा आहे.”
धंगेकर यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केलं आहे की, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याबरोबरच मंदिरे आणि देवस्थानांच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. “या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी तेव्हाच होऊ शकते जेव्हा या प्रकरणातील संबंधित मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतील,” असे त्यांनी नमूद केले आहे.
या पत्राच्या प्रती धंगेकर यांनी देशाचे गृह व सहकारमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही पाठवल्या आहेत. या सर्वांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने हा व्यवहार रद्द करावा आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
धंगेकर यांनी सांगितले की, “आजपर्यंतच्या अठरा दिवसांच्या संघर्षात आम्ही अनेक पुरावे सादर केले आहेत. या व्यवहारातील सर्वच व्यक्ती आणि संस्था या मुरलीधर मोहोळ यांच्या संबंधित असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. तरीही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे आम्ही आता बेमुदत धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.”
27 ऑक्टोबरपासून जैन बोर्डिंग परिसरात धंगेकर आणि शिवसेनेचे कार्यकर्ते या आंदोलनास सुरुवात करणार आहेत. “हा व्यवहार रद्द होईपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही,” असा निर्धार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रवींद्र धंगेकर यांच्या या थेट पावलामुळे भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
