आत्महत्येपूर्वी घडलेल्या घटनांचा तपास सुरू
फलटण : मधील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने अखेर फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने सातारा, पंढरपूर आणि पुणे जिल्ह्यातील पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. अखेर शनिवारी सकाळी त्याने स्वतःहून फलटण शहर पोलीस ठाण्यात येऊन आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर तिच्या हातावर लिहिलेल्या नोटमध्ये निलंबित PSI गोपाळ बदने याने तिच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा धक्कादायक उल्लेख करण्यात आला होता. या खुलाशानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. घटनेनंतर गोपाळ बदनेला तत्काळ निलंबित करण्यात आलं होतं आणि तो फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा माग काढण्यासाठी विशेष पथक नेमले होते. त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपूर येथे सापडल्याने पथक त्या दिशेने रवाना झालं होतं, तसेच सातारा पोलिसांची टीम पुण्यातही पाठवण्यात आली होती.
डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणात दुसऱ्या आरोपी प्रशांत बनकर याचं नावही समोर आलं होतं. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये प्रशांत बनकर याने चार महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं नमूद होतं. ही घटना समोर आल्यानंतर तोही फरार झाला होता. पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक करून फलटण न्यायालयात हजर केलं असून, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात आता निलंबित PSI गोपाळ बदने स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याने पुढील चौकशीला गती मिळणार आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करावी, अशी मागणी राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्यांनी मृत डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “डॉक्टर तरुणीला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले.
सध्या गोपाळ बदने पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्याकडून आत्महत्येपूर्वी घडलेल्या घटनांचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील पुढील कार्यवाही काय दिशा घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
