१ नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’चे आयोजन
मुंबई : राज्यातील मतदार यादीतील खोट्या नावांचा मुद्दा आता गंभीर बनला आहे. या प्रकरणावर महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे) यांनी एकत्र येत निवडणूक आयोगाविरोधात जोरदार आंदोलनाची हाक दिली आहे. या संदर्भात १ नोव्हेंबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
या मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), माकप, भाकप यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत की, “हा मोर्चा न भूतो न भविष्यती असावा, दिल्लीपर्यंत त्याची दखल घेतली गेली पाहिजे.”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे नेते अनिल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्चाची सुरुवात फॅशन स्ट्रीट येथून होईल. तेथून मेट्रो सिनेमा मार्गे हा मोर्चा मुंबई महापालिकेसमोर येईल. मोर्चाच्या पुढील नियोजनावर सध्या काम सुरू असून, लवकरच पत्रकार परिषदेत वरिष्ठ नेते सर्व तपशील जाहीर करणार असल्याचेही अनिल परब यांनी सांगितले.
मोर्चाच्या तयारीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे नेते यांनी आझाद मैदान परिसरात पाहणी केली.
या वेळी अनिल परब, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, अरविंद सावंत आदी नेते उपस्थित होते. पाहणीनंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांची एकत्र बैठक घेण्यात आली.
१ नोव्हेंबरला निघणाऱ्या या मोर्चाचे नाव “सत्याचा मोर्चा” असे ठेवण्यात आले आहे. मनसेने यासाठी एक विशेष ग्राफिक जारी केले असून, त्यामध्ये “संविधान वाचवा, लोकशाही जगवा” असे आवाहन करण्यात आले आहे.
या ग्राफिक्सनुसार दुपारी १ वाजता हिंदू जिमखाना, मरीन लाईन्स येथे जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मनसेने म्हटले आहे “ही सत्तेची लढाई नाही, ही सत्याची लढाई आहे. ही खऱ्या मतदारांची लढाई आहे, खोट्या मतदारांची नाही.”
त्यामुळे खोट्या मतदार यादीविरोधात हा भव्य मोर्चा हाती घेण्यात आला असून, सर्व खरे मतदार सहभागी व्हा! असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.
