Budget 2026 : भारतातील अर्थसंकल्पाची ऐतिहासिक वाटचाल! ब्रिटीश काळापासून स्वतंत्र भारताच्या पहिल्या बजेटपर्यंतचा प्रवास

 

Budget 2026 च्या पार्श्वभूमीवर भारतात अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा कधी सुरू झाली, स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला आणि बजेट शब्दाचा उगम काय, याचा सविस्तर आढावा.

मुंबई : Budget 2026 च्या पार्श्वभूमीवर भारतातील अर्थसंकल्पीय परंपरेचा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे. केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण येत्या 1 फेब्रुवारी रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार असून हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प असणार आहे. रविवारी सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण, भारतावर लादलेले जादा शुल्क, सोन्या-चांदीच्या वाढलेल्या किंमती आणि शेअर बाजारातील घसरण या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

भारतात अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा ही ब्रिटीश काळापासून सुरू झाली. जगात सर्वप्रथम ब्रिटनमध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धत अस्तित्वात आली आणि त्यानंतर ती भारतात रूढ झाली. भारतातील पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी सादर करण्यात आला होता. तत्कालीन ब्रिटिश सरकारमधील अर्थतज्ज्ञ जेम्स विल्सन यांनी हा पहिला अर्थसंकल्प मांडला होता. त्या काळात सरकारच्या वार्षिक उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा मांडण्यासाठी अर्थसंकल्प सादर केला जात असे.

स्वातंत्र्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात आला. स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री आर. के. शनमुखम चेट्टी यांनी हा ऐतिहासिक अर्थसंकल्प संसदेत मांडला होता. शनमुखम चेट्टी हे नामांकित वकील आणि अर्थतज्ज्ञ होते. स्वातंत्र्यानंतरच्या आर्थिक आव्हानांना सामोरे जाताना त्यांनी देशाला आर्थिक दिशा देणारा पहिला अर्थसंकल्प सादर केला.

दरम्यान, ‘बजेट’ या शब्दाचाही एक रंजक इतिहास आहे. Budget हा शब्द फ्रेंच भाषेतील ‘Bougette’ या शब्दावरून इंग्रजीत आला असून त्याचा मूळ अर्थ चामड्याची पिशवी असा होतो. लॅटिन शब्द ‘Bulga’ पासून हा शब्द विकसित झाला आणि पुढे तो अर्थसंकल्पासाठी वापरात आला.

यापूर्वी भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी सादर केला जात होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात या परंपरेत बदल करण्यात आला. अरुण जेटली अर्थमंत्री असताना 1 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्प सादर करण्याची नवी पद्धत सुरू करण्यात आली, जेणेकरून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच धोरणांची अंमलबजावणी करता येईल.

Budget 2026 सादर झाल्यानंतर निर्मला सीतारमण या माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या सलग नऊ अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाशी बरोबरी करतील. याआधी प्रणव मुखर्जी यांनी आठ वेळा, तर मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक दहा वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा देशाचा 88 वा केंद्रीय अर्थसंकल्प ठरणार असून, यातून सरकार सामान्य नागरिकांना कोणता दिलासा देणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

--------------------------------

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने