विविध राज्यातून आलेल्या सदस्यांचा दारू विळख्यातून मुक्ततेचा संकल्प!

आ. डॉ. राऊत यांच्या उपस्थितीत अल्कोहॉलिक्स ॲनॉनिमसचे संमेलन

नागपूर : दारूच्या विळख्यातून बाहेर पडून नव्या जीवनाची दिशा मिळवण्यासाठी कार्यरत असलेल्या अल्कोहॉलिक्स ॲनॉनिमस (AA) या संस्थेचं दोन दिवसीय प्रादेशिक संमेलन नागपुरात मोठ्या उत्साहात पार पडलं. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, तेलंगणा आणि गोवा राज्यांतील सदस्यांनी या संमेलनात सहभागी होत “व्यसनमुक्तीचा संदेश” समाजापर्यंत पोहोचवला.

या संमेलनाचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री आणि आ. डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. राऊत म्हणाले, “दारूचे व्यसन हे केवळ आरोग्याचं नव्हे तर कुटुंब आणि समाजाचंही नुकसान करतं. अशा वेळी अल्कोहॉलिक्स ॲनॉनिमससारख्या संघटनांचे योगदान अमूल्य आहे. समाजाने या चळवळीला अधिक बळ द्यायला हवं.”

संमेलनात क्लास ट्रस्टी (GSB India) अध्यक्षा डॉ. संध्या पवार, सहाय्यक कामगार आयुक्त प्रतिभा भाकरे, तसेच विविध राज्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या या संमेलनात व्यसनातून बाहेर पडलेल्या सदस्यांनी आपले अनुभव मांडले. “दारूपासून मुक्त होऊन नव्या आयुष्याची सुरुवात कशी शक्य झाली” हे सांगताना अनेकांनी उपस्थितांना प्रेरित केलं.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, अल्कोहॉलिक्स ॲनॉनिमस ही संस्था कोणत्याही धार्मिक, राजकीय किंवा व्यावसायिक हेतूने कार्य करत नाही. तिचं एकमेव ध्येय म्हणजे दारूमुक्त, निरोगी आणि आनंदी समाज घडवणे. या चळवळीत स्वयंसेवक कोणतेही शुल्क न घेता व्यसनाधीन व्यक्तींना समुपदेशन, गटचर्चा आणि मानसिक आधार देतात.

संमेलनाचा समारोप सामूहिक शपथविधीने झाला, जिथे सर्व सदस्यांनी “व्यसनमुक्त राहण्याची आणि इतरांनाही या अभियानात सामील करण्याची” शपथ घेतली.

या कार्यक्रमाचा संदेश ठळकपणे अधोरेखित झाला तो म्हणजे “दारू नाही समाधान, व्यसनमुक्तीचं जीवन हाच खरा उत्सव आहे!”


Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने