विरोधकांचा सुफडासाफ करा, अमित शाह यांनी दिला संदेश
मुंबई : “आज भाजप कुणाच्या आधारावर नाही, तर स्वतःच्या बळावर उभा आहे,” असं ठामपणे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं स्फुल्लिंग पेटवलं. मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तसेच पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. अमित शाह यांनी या प्रसंगी कार्यकर्त्यांना संदेश दिला की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत अशी लढत द्या की, विरोधकांचा सुफडासाफ झाला पाहिजे. दुर्बिण लावूनही ते सापडता कामा नयेत!”
अमित शाह म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतींना वंदन करून मी या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यात सहभागी झालो आहे. भाजपचं प्रत्येक कार्यालय हे केवळ इमारत नसून कार्यकर्त्यांसाठी एक मंदिर आहे. इथे कार्यकर्ते प्रशिक्षण घेतात, विचार घडवतात आणि राष्ट्रहितासाठी निष्ठेने काम करतात.”
ते पुढे म्हणाले, “भाजपने नेहमी सिद्धांतांच्या आधारे धोरणं आखली आहेत. भारत आणि भारतीय जनतेच्या हितासाठी आम्ही संघर्ष केला आहे. आज महाराष्ट्र भाजप आपली परंपरा जपत नव्या पर्वाची सुरुवात करत आहे. ही नवी ५५ हजार चौरस फुटांची इमारत पक्षाच्या वाढत्या शक्तीचं प्रतीक आहे. यात लायब्ररी, कॉन्फरन्स रूम आणि प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांसाठी स्वतंत्र कार्यालय आहे. ही इमारत दररोज मुख्यमंत्र्यांना आठवण करून देईल की, येत्या निवडणुकीत इथूनच विजय मिळवायचा आहे!”
शाह यांनी पुढे सांगितले, “भाजप हा असा पक्ष आहे जिथे एक बुथ प्रमुख सुद्धा देशाचा अध्यक्ष होऊ शकतो. आमचा पक्ष घराणेशाहीवर नव्हे, तर कार्यकुशलतेवर चालतो. ज्यांच्यात क्षमता आहे, त्यांनाच पुढे जाण्याची संधी मिळते. एका गरीब चहावाल्याचा मुलगा आज तीन वेळा देशाचा पंतप्रधान झाला हे लोकशाहीवरील आमच्या विश्वासाचं जिवंत उदाहरण आहे.”
शाह यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की, “डिसेंबर २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपचं कार्यालय उभं राहिलं पाहिजे. हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी मी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांवर सोपवतो.”
कार्यक्रमाच्या शेवटी अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना प्रेरित करत म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अशी लढत द्या की विरोधकांचा सुफडासाफ झाला पाहिजे. दुर्बिण लावूनही ते सापडता कामा नयेत!”
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाषण करत २०१४ च्या निवडणुकीची आठवण करून दिली. ते म्हणाले, “त्या वेळी आम्ही स्वतंत्र लढलो आणि महाराष्ट्राला पहिला भाजपचा मुख्यमंत्री मिळाला. आता केवळ डबल इंजिन नव्हे, तर ट्रिपल इंजिन सरकारची वेळ आली आहे.”
मुंबईतील या सोहळ्यात अमित शाह यांची गर्जना आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून स्पष्ट होत आहे की, भाजपने आगामी स्थानिक निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
