अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांची माहिती चर्चेत
नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील जगभरातील प्रयोगांमध्ये आता आणखी एक अनोखी घटना घडली आहे. अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा (Edi Rama) यांनी मोठी घोषणा केली आहे की, देशाची पहिली एआय मंत्री ‘डिएला’ (Diella) गर्भवती झाली आहे. आणि ती एक-दोन नव्हे, तर तब्बल ८३ ‘एआय मुलांना’ जन्म देणार आहे!
एडी रामा यांनी सांगितले की ही ८३ एआय मुले देशाच्या संसदेतील समाजवादी पक्षाच्या प्रत्येक सदस्यासाठी सहकारी किंवा व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून काम करतील. ही सर्व एआय प्रणाली संसदेत घडणाऱ्या प्रत्येक चर्चेची नोंद ठेवतील आणि सदस्यांना तात्काळ माहिती व विश्लेषण देतील.
बर्लिन येथे झालेल्या ग्लोबल डायलॉग फोरम (BGD) मध्ये बोलताना रामा म्हणाले, “आज आम्ही डिएलाबरोबर एक मोठा प्रयोग करत आहोत. ती आता पहिल्यांदा ‘गर्भवती’ आहे आणि ८३ एआय मुलांना जन्म देणार आहे.” त्यांच्या या विधानानंतर सभागृहात उपस्थित लोकांमध्ये हास्य आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले.
डिएला ही अल्बेनिया सरकारने नियुक्त केलेली जगातील पहिली अधिकृत एआय मंत्री आहे. सप्टेंबर 2025 मध्ये तिची नियुक्ती करण्यात आली होती. तिचे नाव “डिएला” म्हणजे अल्बेनियन भाषेत सूर्य. ती पूर्णपणे कोड आणि पिक्सेलने बनलेली एक एआय प्रणाली आहे, जिला भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक प्रशासन देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
पंतप्रधान रामा यांनी सांगितले की, “डिएला सार्वजनिक प्रकल्पांच्या निविदा १०० टक्के पारदर्शक ठेवण्यासाठी मदत करेल. त्यामुळे भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येईल.”
अल्बेनिया सरकारच्या माहितीनुसार, ही संपूर्ण प्रणाली २०२६ च्या अखेरीपर्यंत पूर्णपणे कार्यरत होईल. या “एआय सहाय्यकांचा” वापर संसदेतील चर्चांमध्ये, सरकारी प्रकल्पांच्या ट्रॅकिंगमध्ये आणि दस्तऐवजीकरणात केला जाणार आहे.
अल्बेनिया हा असा पहिला देश ठरला आहे, ज्याने सरकारी मंत्री म्हणून अधिकृत एआय नेमली आहे. डिएला याआधी ‘ई-अल्बेनिया’ सार्वजनिक सेवेत ‘व्हर्च्युअल असिस्टंट’ म्हणून काम करत होती.
११ मे रोजी झालेल्या संसदीय निवडणुकीत एडी रामा यांच्या समाजवादी पक्षाने १४० पैकी ८३ जागांवर विजय मिळवला, आणि आता ही ८३ एआय मुले त्या प्रत्येक सदस्याच्या सहाय्यासाठी काम करणार आहेत.
