कोणत्या आघाडीची ‘युवानिती’ जिंकणार मन?
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election 2025) यंदा सर्वाधिक चर्चा ज्या मतदार वर्गाची आहे तो म्हणजे Gen-Z म्हणजेच 1997 नंतर जन्मलेले तरुण मतदार. या पिढीचा विचार, दृष्टिकोन आणि राजकीय दृष्ट्या अपेक्षा सर्वस्वी वेगळ्या आहेत. राज्यातील सुमारे ७.४१ कोटी मतदारांपैकी तब्बल १.७५ कोटी मतदार हे Gen-Z आहेत, म्हणजेच प्रत्येक चार मतदारांपैकी एक जण हा नव्या विचारांचा युवक आहे. या तरुण मतदारांचा कल कोणत्या आघाडीकडे झुकतोय, यावरच निकालाचा तोल ठरणार आहे.
बिहारमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार असून, ६ नोव्हेंबरला १२१ आणि ११ नोव्हेंबरला उर्वरित १२२ जागांसाठी मतदान होईल. दरम्यान, सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी तरुण मतदारांना केंद्रस्थानी ठेवत आपापले निवडणूक अजेंडे तयार केले आहेत.
Gen-Z म्हणजे 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली पिढी ही ती पिढी आहे जिच्या डोळ्यांसमोर इंटरनेट, मोबाईल आणि सोशल मीडियाने जग बदलताना पाहिले. तंत्रज्ञानाशी एकरूप झालेल्या या तरुणांना केवळ स्थानिक नव्हे तर जागतिक दृष्टिकोनाची जाण आहे. या पिढीने बालपणापासून मोबाईल गेम्स, डिजिटल मनोरंजन आणि ऑनलाइन शिक्षण अनुभवले आहे. त्यामुळे ते राज्यातील व्यवस्थेची तुलना देश आणि जगाशी करू शकतात.
नीतीश कुमार यांच्या सत्ताकाळात वाढलेल्या या तरुण पिढीने लालू यादव किंवा काँग्रेसच्या काळातील बिहार पाहिलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्या आठवणीत "जुना बिहार" नसून, ते सध्याच्या राज्यव्यवस्थेवरच मत बनवतात. त्यामुळे नीतीश कुमार यांचे “२० वर्षांपूर्वीचं बिहार” असं म्हणणं या नव्या मतदारांना फारसं भावत नाही.
या पिढीला रोजगार, शिक्षण, उद्योग आणि पारदर्शकता हवे आहे धर्म, जात आणि जुन्या राजकारणावर आधारित भाषणे नाहीत. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आपल्या निवडणूक मोहिमेत युवावर्गाला केंद्रस्थानी ठेवले आहे.
नीतीश कुमार यांनी नुकतंच पदवीधर आणि बारावी उत्तीर्ण बेरोजगार तरुणांना दोन वर्षांपर्यंत दरमहा ₹१,००० देण्याची योजना जाहीर केली आहे. तसेच “एक कोटी नोकऱ्या” देण्याचं आश्वासन दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुद्रा योजना, डिजिटल इंडिया आणि थेट खात्यात येणाऱ्या सरकारी मदतीमुळे एनडीएला पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोदींची ठाम आणि जागतिक दर्जाची प्रतिमा युवा मतदारांना आकर्षित करते.
तेजस्वी यादव आणि महागठबंधनचा युवा दृष्टीकोन
आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी आपला लुक आणि भाषाशैली दोन्ही बदलले आहेत. कुर्ता-पायजमा ऐवजी आता ते टी-शर्ट आणि जीन्समध्ये तरुण मतदारांशी संवाद साधताना दिसतात. त्यांनी वचन दिलं आहे की महागठबंधन सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळेल. तसेच प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि पॅरामेडिकल कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली आहे. पलायन आणि बेरोजगारी हा मुद्दा त्यांनी केंद्रस्थानी ठेवला आहे.
प्रशांत किशोर (पीके) आणि जनसुराजचा नवा प्रयोग
चुनावी रणनीतिकारापासून राजकारणात आलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) आपल्या जनसुराज आंदोलनद्वारे बिहारला नवा पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. भ्रष्टाचार, शिक्षणातील विलंब, बेरोजगारी आणि सरकारी यंत्रणेतील अपयश या मुद्द्यांवर ते सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत आहेत. त्यांची मांडणी तरुणांना भावते आहे, परंतु संघटनात्मक बळ आणि जुनी सियासी जम बसविण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे.
युवा मतदार काय विचार करतोय?
लोकनीती-सीएसडीएसच्या 2020 च्या सर्वेक्षणानुसार, 21% मतदारांनी रोजगार, उद्योग आणि भरतीतील उशीर हे त्यांचा मतदान निर्णय ठरवणारे प्रमुख मुद्दे असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे या वेळीही तरुण मतदारांचे प्राधान्यक्रम स्पष्ट आहेत — त्यांना हवे आहेत रोजगाराच्या संधी, शिक्षणात पारदर्शकता आणि पलायनाला पूर्णविराम.
बिहारचा Gen-Z आता सोशल मीडिया आणि ऑनलाइन चर्चांमधून मत बनवतो. तो जात, धर्म किंवा पारंपरिक निष्ठेपेक्षा कामगिरी आणि दृष्टिकोन पाहतो. त्यामुळे या निवडणुकीत प्रश्न एकच आहे — कोण जिंकेल Bihar Gen-Z चं मन?
