युद्धाचा महागाईवर जबरदस्त परिणाम, नागरिकांचे हाल
पाकिस्तान : सध्या महागाईने (Pakistan Inflation) थैमान घातले आहे. अफगाणिस्तानशी झालेल्या सीमावादामुळे (Pakistan Afghanistan Border Conflict) व्यापार ठप्प झाला असून, याचा थेट परिणाम जनजीवनावर झाला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटो 600 रुपये किलो, आले 750 रुपये किलो या दराने विकले जात असून, नागरिकांच्या हाताला स्वयंपाकघर चालवणेही अवघड झाले आहे.
११ ऑक्टोबरपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमधील सुमारे २,६०० किलोमीटर लांबीच्या सीमेवरील सर्व गेट बंद करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या संघर्षात (Border Clash) दोन्ही बाजूंनी गोळीबार आणि हवाई हल्ले झाले, ज्यात डझनभर लोकांचा मृत्यू झाला. या संघर्षामुळे दोन्ही देशांमधील व्यापार पूर्णपणे ठप्प झाला असून, अन्नधान्य, फळे आणि भाज्यांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.
काबूलमधील Pakistan-Afghanistan Chamber of Commerce चे प्रमुख खान जान अलोकझाई यांच्या मते, या संघर्षामुळे दोन्ही देशांना आतापर्यंत सुमारे १ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. पूर्वी दररोज ५०० पेक्षा जास्त कंटेनरमध्ये भाजीपाला आणि फळांची देवाणघेवाण होत असे. मात्र, सीमेवरील गेट बंद असल्याने आता ५,००० हून अधिक कंटेनर माल सीमेवर अडकले आहेत. त्यामुळे टोमॅटो, सफरचंद, द्राक्षे आणि इतर फळभाज्यांचा पुरवठा बंद पडला आहे.
रावळपिंडी भाजीपाला बाजार व्यापारी संघटनेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, मागणी प्रचंड वाढली असून पुरवठा थांबल्याने दर आकाशाला भिडले आहेत. लहान विक्रेत्यांनी महागाईमुळे टोमॅटो, आले, लसूण आणि वाटाण्याची विक्री बंद केली आहे. सध्या लसूण ४०० रुपये किलो, कांदे १२० रुपये किलो आणि वाटाणे तब्बल ५०० रुपये किलोने विकले जात आहेत.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये फळे, भाज्या, तांदूळ, साखर, मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. पण सीमा बंद झाल्यामुळे हा व्यापार ठप्प झाला आहे. परिणामी बाजारात वस्तूंची टंचाई निर्माण झाली असून, सर्वसामान्य नागरिकांना दिवसभराचे जेवणसुद्धा महागडं पडत आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या (Economic Crisis in Pakistan) नागरिकांना महागाईचा हा नवा झटका बसला आहे. सरकारकडे उपाययोजना नसल्याने जनतेचा रोष वाढत आहे. सीमेवरील तणाव शांत न झाल्यास अन्नधान्याच्या किमती आणखी वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.