ना लेकरांना कपडे, ना फटाके; शासनाची मदत पोचली नाहीच
सोलापूर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall in Maharashtra) शेतकऱ्यांचे आणि गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने नुकतेच 31 हजार कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अनेक गावांपर्यंत ती मदत पोहोचलेलीच नाही. सोलापूर जिल्ह्यातील सुलतानपूर आणि दारफळ या गावांतील ग्रामस्थ अजूनही शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
सुलतानपूर हे सीना नदीच्या महापुराने (Flood in Sina River) सर्वाधिक प्रभावित झालेले गाव. संपूर्ण गाव पाण्याखाली गेल्यानंतरही येथे कोणतीही आर्थिक मदत किंवा घरांच्या नुकसानीची भरपाई सरकारकडून मिळालेली नाही. ग्रामस्थांनी सांगितले की, “आमचं संपूर्ण घर पाण्याखाली गेलं. लाखो रुपयांचं नुकसान झालं. पण आजपर्यंत शासनाकडून एक रुपयाही मिळालेला नाही.” ऊस शेतीही वाहून गेली, त्यासाठी केवळ ११,२०० रुपये नुकसानभरपाई मिळाली आहे. मात्र घराच्या नुकसानीसाठी अद्याप काहीही मदत मिळालेली नाही.
अशीच अवस्था अनेक शेतकऱ्याची आहे. काहींच्या शेतीचे नुकसान मान्य झाले असले तरी घराच्या नुकसानीसाठी अद्याप शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. “दिवाळी लोकांच्या मदतीवरच साजरी केली,” असं सांगताना ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. सरकारने दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र दिवाळी संपल्यानंतरही गावकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.
महापुराने हाहाकार माजवलेल्या माढा तालुक्यातील दारफळ गावाचीही स्थिती वेगळी नाही. या गावातील बोराटे वस्तीमधील रहिवाशांना आजही शासनाची मदत मिळालेली नाही. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट दिली होती, जिथे 126 लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचवावे लागले होते. तरीदेखील त्या कुटुंबांना आजतागायत कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही.
दारफळ गावातील चिमुरड्यांना यंदा ना नवीन कपडे, ना फटाके, ना फराळाचे गोडधोड पदार्थ. “आमच्याकडे दिवाळी नाही,” असं सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख शब्दांत व्यक्त करता येणं कठीण होतं.
अतिवृष्टी, पूर आणि शेती तसेच घरांच्या नुकसानीनंतर गावकऱ्यांनी सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेवली होती. मात्र, आश्वासनं आणि घोषणांच्या पलीकडे प्रत्यक्ष मदत पोहोचलेली नाही, हीच वस्तुस्थिती दिवाळीनंतरही बदललेली नाही.
