३ ठार, ड्रग्जच्या प्रभावाखाली ट्रक चालवत होता जसनप्रीत सिंग
कॅलिफोर्निया : अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका भीषण रस्ते अपघाताने भारतीय ट्रकचालकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून, आरोपी ट्रक चालक जसनप्रीत सिंग हा मद्य आणि ड्रग्जच्या प्रभावाखाली वाहन चालवत होता, अशी माहिती हायवे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सॅन बर्नार्डिनो काउंटी फ्रीवेवर ही घटना घडली. जसनप्रीत सिंग चालवत असलेला सेमी-ट्रक हळू गतीने जाणाऱ्या वाहनांना मागून धडकला. या भीषण धडकेत अनेक गाड्या चिरडल्या गेल्या आणि तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकच्या डॅशकॅममधील दृश्ये समोर आली असून त्यात जसनप्रीतचा ट्रक एका एसयूव्हीवर जोरात आदळताना दिसतो.
पोलिस तपासात उघड झाले की जसनप्रीतने अपघाताच्या वेळी ब्रेक लावण्याचाही प्रयत्न केला नव्हता. प्राथमिक तपासणीनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे वैद्यकीय तपासणीत तो मद्यधुंद आणि ड्रग्जच्या प्रभावाखाली असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) दिलेल्या माहितीनुसार, जसनप्रीत सिंगकडे अमेरिकेत राहण्याचा कोणताही वैध स्थलांतर दर्जा नव्हता. तो 2022 मध्ये दक्षिणेकडील सीमा ओलांडून बेकायदेशीररित्या अमेरिकेत दाखल झाला होता. “अटकेच्या पर्याय” (Alternatives to Detention) धोरणाअंतर्गत त्याला तात्पुरती मुभा देण्यात आली होती. मात्र आता यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ने त्याच्याविरुद्ध इमिग्रेशन डिटेनर जारी केला आहे.
ही पहिली घटना नाही. ऑगस्ट 2024 मध्येही फ्लोरिडाच्या फोर्ट पियर्स येथे हरजिंदर सिंग नावाच्या आणखी एका भारतीय ट्रकचालकाने अशाच प्रकारचा भीषण अपघात घडवून आणला होता. त्यात देखील तीन जणांचा मृत्यू झाला होता. तोसुद्धा अमेरिकेत बेकायदेशीरपणे दाखल झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले होते.
या सलग घडामोडींमुळे अमेरिकेत ट्रक चालकांच्या परवान्यांच्या पडताळणीविषयी आणि स्थलांतर नियंत्रणाविषयी पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. दारू किंवा ड्रग्जच्या प्रभावाखाली वाहन चालवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
