थकबाकीचा बळी !‘सुंदर शाळा’ योजनेत गुंता
मुंबई : पवईतील आर. ए. स्टुडिओमध्ये घडलेल्या रोहित आर्य प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आणि पोलिस चकमकीत ठार झालेल्या रोहित आर्यच्या आयुष्यामागे केवळ गुन्हेगारी नाही, तर सरकारच्या थकबाकीची आणि अन्यायाची कहाणी दडलेली असल्याचं समोर आलं आहे. एका सरकारी योजनेतील प्रलंबित देणगी आणि त्यातून निर्माण झालेल्या नैराश्याने अखेर रोहित आर्यचा जीव घेतला.
रोहित आर्य यांनी गेल्या वर्षी शिंदे सरकारच्या काळात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या योजनेअंतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर’ हा उपक्रम राबवला होता. शाळांची स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या सहभागातून शिस्त आणि पर्यावरण जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. या कामासाठी रोहित आर्य यांनी स्वतःचे घर, दागिने विकले आणि वैयक्तिक कर्ज घेतलं. मात्र, दोन कोटी रुपयांहून अधिक रक्कम सरकारने न दिल्याने त्यांचं आर्थिक नुकसान आणि मानसिक संतुलन दोन्ही बिघडले.
रोहित आर्य यांनी या थकबाकीविरोधात दोनदा आमरण उपोषण केलं होतं. एकदा पुण्यात पत्रकार भवनासमोर सलग 16 ते 17 दिवस त्यांनी उपोषण केलं. त्यावेळी त्यांनी सरकारशी केलेला संपूर्ण पत्रव्यवहार कार्यकर्त्यांना दाखवला होता. मात्र, तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांना फक्त आश्वासन मिळालं. त्यानंतरही थकीत रक्कम न मिळाल्याने आर्य प्रचंड नैराश्यात गेले. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुरज लोखंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
गुरुवारी घडलेल्या घटनेत, रोहित आर्य यांनी 17 मुलांना जाहिरातीसाठी ऑडिशनच्या बहाण्याने पवईतील आर. ए. स्टुडिओत बोलावलं आणि ओलीस ठेवलं. तासन्तास सुरू असलेल्या या थरारक घटनाक्रमाचा शेवट मुंबई पोलिसांच्या कारवाईत झाला. पोलिसांनी आर्यच्या छातीत गोळी झाडून त्याला ठार केलं.
या घटनेनंतर अनेकांनी सरकारच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या योजनेचा हेतू शाळांचं आधुनिकीकरण, सौंदर्यीकरण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा होता. ५ डिसेंबर २०२३ रोजी सुरू झालेल्या या योजनेत राज्यभरात स्पर्धा, पुरस्कार आणि शाळा विकास कार्यक्रम राबवण्यात आले होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर शिंदे सरकारच्या अनेक योजना थांबवल्या गेल्या. त्यात ही योजना देखील निधीअभावी बंद करण्यात आल्याची चर्चा आहे.
रोहित आर्यच्या मृत्यूनंतर आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळत आहे. ‘शासनाने वेळेवर थकबाकी दिली असती, तर एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला नसता,’ असा सवाल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. रोहित आर्य यांची पत्नी आयसीआयसीआय बँकेत मोठ्या पदावर कार्यरत असून, त्यांना एक लहान मुलगा आहे. कुटुंबाने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
