बावनकुळेंच्या विधानावर जोरदार टीका, नंतर दिले स्पष्टीकरण
मुंबई: महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. “सगळ्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअॅप सर्वेलन्सवर टाकले आहेत” असे त्यांनी गुरुवारी भंडाऱ्यात झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत म्हटले होते. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, विरोधकांनी थेट बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर बावनकुळे यांच्या अटकेची मागणी केली आहे.
कार्यक्रमादरम्यान बावनकुळे म्हणाले होते, “कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि भंडाऱ्यातील व्हॉट्सअॅप ग्रुप्स सर्वेलन्सवर आहेत.” या वक्तव्याचा अर्थ राजकीय नेत्यांचे आणि नागरिकांचे फोन टॅपिंग सुरू असल्याचा घेतल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी म्हटलं, “जर हे खरे असेल, तर हे राज्यातील लोकशाही आणि नागरिकांच्या स्वातंत्र्यावर हल्ला आहे. अशा कृत्यांसाठी बावनकुळे यांना तत्काळ अटक केली पाहिजे.”
विरोधकांच्या हल्ल्यानंतर आता महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटलं, “मी काल आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते वक्तव्य केलं होतं. आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली कामं, त्यांनी केलेल्या टिप्पण्या, व्हॉट्सअॅपवरील प्रतिक्रिया या आमच्या पक्षाच्या ‘वॉर रूम’मधून तपासल्या जातात. निवडणुकीच्या काळात पक्षाची कामं प्रभावीपणे पार पडावीत म्हणून आमच्या कार्यकर्त्यांच्या सक्रियतेवर लक्ष ठेवले जाते. त्याचा अर्थ असा नाही की आम्ही सर्वसामान्य लोकांचा किंवा विरोधकांचा सर्वेलन्स करत आहोत.”
बावनकुळे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या उपक्रमांवरही आमचा पक्ष लक्ष ठेवतो. आमच्या कार्यकर्त्यांनी त्या योजनांचा प्रचार-प्रसार किती प्रमाणात केला, हे पाहण्यासाठीच हे सर्व मॉनिटरिंग असतं.”
संजय राऊतांच्या अटकेच्या मागणीवर प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “आमचा पक्ष आम्ही कसा चालवावा हे शिकवणारे संजय राऊत कोण? त्यांना का मिरची झोंबली? आमच्या पक्षात रोज संवाद साधला जातो. कार्यकर्त्यांशी विचारांची देवाणघेवाण व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून होते, म्हणून मी असं वक्तव्य केलं. पण त्याचा अर्थ वेगळा लावला गेला.”
या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर “नागरिकांच्या खाजगी जीवनावर पाळत ठेवण्याचा” आरोप केला जात आहे, तर भाजपचे नेते याला “राजकीय गैरसमज आणि वाक्याचा विपर्यास” म्हणत आहेत. बावनकुळेंच्या या वक्तव्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीवरही नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
_____________
