साताऱ्याची डॉक्टर हरली, व्यवस्थेविरोधात लोक उठले !

 


आत्महत्या प्रकरणाने राज्य हादरलं, मुख्यमंत्र्यांचा तात्काळ आदेश !


सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे या तरुण महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील दबाव, पोलिसांचा छळ आणि सिस व्यवस्थेचा ताण यांच्या संगमातून घडलेली ही घटना महाराष्ट्राला हादरवून गेली आहे. लोकांच्या जीवासाठी लढणारी डॉक्टर शेवटी स्वतःचं आयुष्य वाचवू शकली नाही आणि हाच प्रश्न आज राज्यात प्रचंड गाजत आहे: “डॉक्टर सुरक्षित नाहीत तर मग सामान्य नागरिकांचं काय?” असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉ. मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये PSI गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर या दोघांचा उल्लेख केला आहे. “माझ्या मृत्यूस हे दोघे अधिकारी जबाबदार आहेत,” असे त्यांनी स्पष्ट लिहिले आहे. या चिठ्ठीनंतर जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागात धसका बसला आहे.

या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेत “ज्यांचा सहभाग आहे, त्यांना निलंबित करा” असा स्पष्ट आदेश दिला. आदेशानुसार दोन्ही अधिकारी PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना निलंबित करण्यात आले असून चौकशी सुरू आहे. फडणवीस म्हणाले, “महिला डॉक्टरच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांना सोडणार नाही.”

डॉ. मुंडे यांचे नाव काही महिन्यांपूर्वी एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात आले होते. या प्रकरणात पोलिसांशी वाद झाल्यानंतर त्यांच्या विरोधात चौकशी सुरू झाली होती. सततच्या दबावामुळे आणि अपमानामुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या. सहकाऱ्यांनी सांगितलं, “त्या प्रामाणिक आणि निर्भय डॉक्टर होत्या. पण सिस्टिमच्या दडपशाहीपुढे तुटल्या.”

गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं, “सुसाईड नोट सापडली असून दोन पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत. सातारा पोलिस अधीक्षकांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या कोणाचा सहभाग असेल, त्याच्यावर कठोर कारवाई होईल.”

या घटनेनंतर राज्यभरातील डॉक्टर संघटना, महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “डॉक्टर लोकांचे प्राण वाचवतात, पण प्रशासनाने त्यांच्या आयुष्याचं रक्षण करू शकत नाही, ही व्यवस्थेची शोकांतिका आहे,” असे वैद्यकीय संघटनांनी म्हटलं आहे.

#JusticeForDrMunde हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या नेत्यांनी म्हटलं “ही आत्महत्या नाही, ही सिस्टिमने केलेली हत्या आहे. सरकारला जबाबदार ठरवलेच पाहिजे.”

डॉ. मुंडे या केवळ डॉक्टर नव्हत्या, तर त्या अनेक गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण होत्या. त्यांनी सेवाभावाने काम केले, पण जेव्हा अन्यायाविरोधात आवाज उठवला, तेव्हा सिस्टिमने त्यांच्यावरच कारवाई केली. आज त्या नाहीत, पण त्यांचा प्रश्न प्रत्येक संवेदनशील नागरिकाला विचार करायला लावतोय “आपल्या समाजात प्रामाणिक माणूस जिवंत राहू शकतो का?” असा प्रश्न या निमित्ताने व्यवस्थेला विचारला जात आहे.

साताऱ्यातील या घटनेने संपूर्ण राज्यातील प्रशासन हलवून सोडलं आहे. मुख्यमंत्री कार्यालय सतत अहवाल मागवत आहे, आणि फॉरेन्सिक तपास सुरू आहे. पोलिस अधिकारी, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनातील जबाबदार व्यक्तींवर कारवाईची तलवार लटकते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच याप्रकरणी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT) स्थापन होण्याची शक्यता आहे.

डॉ. संपदा मुंडे यांचं निधन ही केवळ एका व्यक्तीची शोकांतिका नाही ती महाराष्ट्रातील प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि आरोग्य व्यवस्थेवरचा आरसा आहे.

त्यांचा मृत्यू विचार मागतो, संवेदना मागतो आणि उत्तरदायित्व मागतो. आता जनता एकच मागणी करते आहे, “संपदाला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.”


____



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने