बॉलीवूडवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचे निधन

 

वयाच्या ७४व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

मुंबई : बॉलीवूड आणि दूरदर्शन क्षेत्रातील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. किडनी फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती चित्रपट निर्माता अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर दिली आहे. सतीश शाह यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

अशोक पंडित यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, “दुःख आणि सदमेने सांगावं लागतंय की आमचे प्रिय मित्र आणि अप्रतिम अभिनेता सतीश शाह यांनी काही तासांपूर्वी अखेरचा श्वास घेतला. त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हे आमच्या चित्रपटसृष्टीसाठी मोठं नुकसान आहे. ओम शांती.”

सतीश शाह यांचा जन्म २५ जून १९५१ रोजी मुंबई येथे झाला. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या शाह यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधून अभिनयाचे शिक्षण घेतले. याच ठिकाणाहून त्यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात झाली.

१९७० च्या दशकाच्या अखेरीस त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सुरुवातीला त्यांनी ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’ आणि ‘गमन’ या चित्रपटांमध्ये छोटे रोल केले. मात्र, १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने भी दो यारों’ या चित्रपटाने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटात त्यांनी भ्रष्ट नगरपालिकेचे आयुक्त डी’मेलो यांची भूमिका साकारली होती, जी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

सतीश शाह यांनी टीव्ही मालिकांमधूनही प्रचंड लोकप्रियता मिळवली. विशेषतः ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेत त्यांनी साकारलेला इंद्रवदन साराभाई हा व्यक्तिरेखा आजही घराघरात ओळखली जाते. त्यांच्या अप्रतिम कॉमिक टाइमिंगमुळे ते प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले.

सतीश शाह यांनी आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत २०० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. त्यातील काही प्रसिद्ध चित्रपट पुढीलप्रमाणे जाने भी दो यारों (1983) मासूम (1983) हम आपके हैं कौन (1994)

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (1995), कल हो ना हो (2003), मैं हूं ना (2004), ओम शांती ओम (2007) रा.वन (2011) २०१४ मध्ये आलेला ‘हमशकल’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर त्यांनी माध्यमांपासून दूर राहणे पसंत केले होते.

सतीश शाह यांनी आपल्या मागे पत्नी मधु शाह आणि असंख्य चाहत्यांच्या आठवणी सोडल्या आहेत. त्यांच्या निधनाने भारतीय विनोदी अभिनय विश्वातील एक उज्ज्वल पर्व संपले आहे. त्यांच्या सहज आणि हृदयस्पर्शी अभिनयामुळे ते कायमच प्रेक्षकांच्या आठवणीत राहतील.

सतीश शाह यांचे निधन किडनी फेल्युअरमुळे झाले. त्यांनी २०० हून अधिक चित्रपट आणि अनेक टीव्ही शोमध्ये काम केले. ‘साराभाई वर्सेस साराभाई’मधील इंद्रवदन साराभाई या भूमिकेमुळे ते घराघरात प्रसिद्ध झाले. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘हमशकल’ (2014) होता. चित्रपट निर्माता अशोक पंडित यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली.






Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने