प्रेस क्लब दिग्रसच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी पत्रकारदिनानिमित्त येथे गुरुवारी प्रसिद्ध वृत्त छायाचित्रकार रामदास पद्मावार यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक मनुहार हॉटेलच्या पहिल्या माळ्यावरील हॉलमध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी साडेदहाला प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा श्रमिक पत्रकार संघा (र. नं.5703) चे अध्यक्ष व दैनिक पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी संदीप खडेकर असतील. दैनिक सकाळचे जिल्हा बातमीदार राजकुमार भीतकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
लेन्स आणि सेन्सचा मेळ
दैनिक ’सकाळ’चे दिग्रस तालुका बातमीदार रामदास पद्मावार यांची खरी ओळख एक मनस्वी छायाचित्रकार अशीच आहे. छायाचित्रे त्यांचा जीव की प्राण आहेत. त्यांचे एक छायाचित्र एका बातमीच्या विषयाला जन्म घालते. त्यांनी विविध प्रसंगाचे टिपलेले छायाचित्र अत्यंत बोलके आहेत. निसर्ग व वन्यजीवांचे त्यांनी केलेले चित्रण म्हणजे लेन्स व सेन्सचा मेळच आहे.
दैनिक लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी नितीन पखाले, सह्याद्री दूरदर्शन वहिनीचे जिल्हा प्रतिनिधी आनंद कसंबे यांच्यासह नगर परिषदेचे उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव सुपारे, पोलिस निरीक्षक सोनाजी आमले, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शेषराव टाले आदींची प्रमुख उपस्थिती असेल. हे प्रदर्शन दुपारी 12 ते सायंकाळी सात वाजतापर्यंत सर्व नागरिक व विद्यार्थ्यांसाठी खुले असेल असे आयोजकांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response