यवतमाळ : गत 24 तासात जिल्ह्यात पाच मृत्युसह ६५४ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या २८८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात कोरोना बाधित व मृतकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे प्रसाशनातील स्थानिक अधिकारी सह वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कोरोना आटोक्यात आण्यासाठी उपाययोजना जरी सुरु असल्या तरी देखील खुद्द विभागीय आयुक्त सिंह यांनी गुरुवारी तातडीची बैठक घेऊन जिल्ह्यात कोरोना मृत्यू आणि पॉझिटिव्ह दर कमी करण्यासाठी गांभिर्याने टेस्टिंग करण्याचे आदेश दिले. वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूचे प्रमाण वाढण्यामागचे कारण काय अशी विचारणा देखील आयुक्त सिंह यांनी यावेळी केली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 70 वर्षीय पुरुष आणि 60, 70 व 81 वर्षीय महिला, कळंब तालुक्यातील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच आज (दि. 1) पॉझेटिव्ह आलेल्या 654 जणांमध्ये 431 पुरुष आणि 223 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 237 जण पॉझिटिव्ह , उमरखेड 81, दिग्रस 53, पुसद 52,आर्णी 40, कळंब 36, पांढरकवडा 35, दारव्हा 34, घाटंजी 19, वणी 19, महागाव 10, नेर 10, बाभुळगाव 8, झरीजामणी 8, मारेगाव 6, राळेगाव 3 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे.
प्रतिबंधित क्षेत्राबाबात बोलतांना ते म्हणाले, प्रतिबंधित क्षेत्रामधील प्रत्येक घराचा सर्व्हे होणे आवश्यक आहे. सोबतच घरातील प्रत्येक व्यक्तिची टेस्टिंग करावी. प्रतिबंधित क्षेत्राची सीमा निश्चित करून यातील घरांची संख्या वाढवा. केंद्र व राज्य शासनाच्या लेखी सुचनांप्रमाणे कार्यप्रणाली राबविणे बंधनकारक आहे. जोपर्यंत जिल्ह्याचा मृत्युदर कमी होत नाही व पॉझिटीव्हीटी दर पाचच्या खाली येत नाही, तोपर्यंत नियमितपणे टेस्टिंग झाल्याच पाहिजे. तालुकानिहाय टेस्टिंगचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. यात थोडी जरी कमतरता आली तर पॉझिटीव्हीटी दर वाढतो. असे विभागीय आयुक्त यांनी सांगितले.
यावेळी सादरीकरण करतांना जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, टेस्टिंगसाठी आणखी दोन नवीन मशीन घेण्यात येत आहे. तशी ऑर्डर देण्यात आली असून या दोन मशीन कार्यान्वित झाल्या तर दररोज 3500 ते 4000 टेस्टिंग होईल. तसेच पुढील 20 दिवसांत यवतमाळ शहरातील 45 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी एकूण 5998 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 654 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5344 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2850 ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1241 तर गृह विलगीकरणात 1609 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 29231 झाली आहे. 24 तासात 288 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 25721 आहे. तर जिल्ह्यात एकूण 660 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 273032 नमुने पाठविले असून यापैकी 268042 प्राप्त तर 4990 अप्राप्त आहेत. तसेच 238811 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response