राजकीय जीवनातील तुमच्या यशाचे रहस्य काय? असे एकदा कोकणचा राजा, अनभिषिक्त सम्राट असलेल्या बॅरिस्टर नाथ पै यांना विचारले असता त्यांनी “न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं ना पुनर्भवम् । कामये दुःखताप्तानां प्राणिनाम् आर्तिनाशनम् ॥"
अर्थात आम्हाला तुमचे राज्यही नको, स्वर्ग आणि पुनर्जन्मही नको तर एक मात्र ईच्छा हीच आहे की, दिन, दु:खी, शोषीत, पिडीतांचे दु:ख दूर करण्याची शक्ती परमेश्वर देवो. असे उत्तर बॅरिस्टर पै.यांनी दिले होते. बॅरिस्टर पै यांचा हा श्लोक उदघ्त करण्याचे कारण म्हणजे वडील पुंडलिकराव गवळी यांच्या अफाट कर्तृत्वाच्या पुण्याईने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी खासदार होण्याचे भाग्य लाभलेल्या भावना गवळी यांनी २८ डिसेंबरला शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन केले आहे.त्यानिमित्ताने त्यांची ही घेतलेली मुलाखत. त्यातून भावना गवळी यांच्या शेतकऱ्यांच्या विष्यीच्या 'भावना' समजून येतात. भाव न खाता लोकांची कामे करावीत आणि त्यांच्या भावनांना दा द्यावी ही "भावना' जोपासणारी भावना गवळी म्हणजे रणरागीणी दुर्गा असल्याचा लौकीक भावनांनी मिळविला आहे. सरकार आपले असो की, विरोधकांचे. जनतेच्या हिताला प्राधान्य देवून काम करीत राहणे. त्याचे श्रेय मिळो अथवा न मिळो ही भावना गवळींची दुर्मिळ भावना जनतेने अनुभवली आहे. त्यामुळेच सातत्याने पाच वेळा खासदारकी मिळविण्याची कठोर तपश्चर्या त्यांनी फळास आणली आहे.
आज महाराष्ट्रात त्यांच्या इतकी सिनियर महिला खासदार दुसरी कोणतीच नाही. ही एक लक्ष्णीय बाब आहे. लोकांसाठी भिंगरीसारखे सतत फिरत राहणे आणि साऱ्यांचे उंबरठे झिजविणे हा त्यांचा स्थाईभाव झाला आहे. मला आठवत की, पुसद तालुक्यात महापुरामुळे उध्वस्त झलेल्या बान्सी गावच्या दोनशेहून अधिक कुटुंबाचा पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. सरकारने घरे बांधली होती पण लाभार्थ्यांनी दहा टक्के रक्कम भरली नाही म्हणून घरांचे वाटप थंबविले होते. भावनाविहीन मनुष्य पशुसमान अशी भावना जोपासणाऱ्या भावना गवळींनी धनत्रयोदशीच्या दिवशी रुद्रावतार दाखवित बान्सीला जावून कुलूपे तोडून घरे लोकांच्या ताब्यात देण्याचा कुणीही करु शकणार नाही असा पराक्रम केला. भावना गवळींच्या व्यक्तीत्वाचे अनेक पैलू आहेत. पहिल्यांदा खासदार झाल्यावर खासदारकीचा कोणताही अनुभव नसताना संसदेमध्ये प्रश्न विचारने किंवा आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात भारताचे प्रतिनिधित्व करताना देशाची बाजू कशी मांडावी याचा त्यांनी खूप अभ्यास केला.
आज राज्यात त्यांच्याच पक्षाचे अर्थात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सरकार आहे. न्याय मिळत नसेल तर त्यांच्यासाठी आंदोलन करायला मागेपुढे न पाहणे हा त्यांचा जो स्थायीभाव आहे त्याचा पुन्हा एकदा परिचय येत आहे. भावना या शब्दावर कितीदातरी वेगवेगळ्या कोटी करून माझ्या विविध लेखांमध्ये त्यांच्या नावाचा वेगळ्या पद्धतीने उल्लेख केला आहे. मनुष्य भावनाशून्य असू नये, लोकांना भाव द्यावा, भावनाविहीन मनुष्य पशुसमान अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे भावना हे नाव त्यांनी सार्थ केले आहे. प्रश्न शेतकऱ्यांचा असो, कामगारांचा असो, कर्मचाऱ्यांचा असो चुकीच्या कामाचे समर्थन करायचे नाही आणि ज्यावर अन्याय झाला त्यासाठी लढायला मागेपुढे पहायचे नाही असा स्वभाव असलेल्या या रणरागिनीचे कर्तृत्व एका लेखामध्ये समाविष्ट होऊ शकत नाही.
सध्या शेतकऱ्यांसमोर जीवन-मरणाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यांच्यासाठी जगण्याचा आधार म्हणजे पिकांचे झालेल्या नुकसानाची भरपाई पिकविम्यातून मिळावी हा आहे. पण शेतकऱ्यांना ती मिळत नाही म्हणून २८ डिसेंबरला मोर्चाचे आयोजन केले आहे. विमा कंपन्यांऐवजी सरकारने स्व:ताच शेतकऱ्यांचा विमा काढावा. कंपन्यांकडून होणारी लुटालुट बंद करावी. ही योजना सरकारनेच राबवावी. एका प्रश्नाच्या उत्तरात खासदार गवळी म्हणाल्या की, अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कापूस, सोयाबिनचा तर लागवड खर्च सुध्दा निघाला नाही.अशा परीस्थितीत पिकविमा कंपण्यांनी बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांचा पिकविमा दिला. त्यामुळे दि. २८ डिसेंबरला सकाळी ११ वाजता स्टेट बॅंक चौक येथील इफको टोकीओ कंपणीच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येणार आहे. या 'जबाब दो आंदोलनात' नागरीक, शेतकरी तसेच सर्व सामाजिक, शेतकरी संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन खासदार भावनाताई गवळी यांनी केले आहे.
यवतमाळ जिल्हयातील शेतकऱ्यांवर कोरोना पाठोपाठ अतिवृष्टीव संकट आले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर जमिनीवरील सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर या पिकांचे नुकसान झाले. परतीच्या पावसाने तर कहरच केला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिकही परतीच्या व ढगफुटीच्या पावसामुळे नष्ट झाले. शेतकऱ्यांना नैसर्गीक आपत्ती ओढवल्यास आर्धिक मदत मिळावी व झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी या करीता पीक विमा काढत असतो. यवतमाळ जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार २१ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिकविमा काढला. या करीता केंद्र व राज्य शासन तसेच शेतकऱ्यांनी इफको टोकीयो विमा कंपणीकडे १६७ कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला. संपुर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असतांना विमा कंपणीने मात्र, फक्त ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज करणाऱ्या ९ हजार ७७६ शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ दिला.वास्तविक एवढा मोठा जिल्हा असतांना विमा कंपणीने १६ तालुक्यात फक्त १०० प्रतिनिधींची सर्वेक्षण करण्यासाठी नेमणूक केली. त्यामुळे लाखो शेतकरी नुकसानीचा दावा दाखल करु शकले नाही. विशेष म्हणजे यवतमाळच्या कृषी विभागाने सुध्दा जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधीत झाल्याचा अंदाज प्राथमिक सर्वेक्षणात नोंदविला आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सर्वेक्षणाच्या आधारावर पिकविमा नुकसान भरपाई देण्याची मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी आधीच केली होती.पिक विमा कंपणीने शेतक-यांना नुकसानभरपाई न दिल्याने अखेर खासदार भावनाताई गवळी जबाब दो आंदोलन करीत आहे. परमेश्वरा आम्हाला अशी माणसे दे!आजच्या काळाची ती गरज आहे. अधिकाराचा मोह त्यांना खाऊन टाकत नाही अशी माणसे . अधिकारपदाच्या फायदयासाठी विकली जात नाहीत अशी माणसे. प्रतिष्ठेची ज्यांना कदर आहे अशी माणसे. अप्रामाणिक नेतृत्वासमोर झुकणार नाहीत अशी माणसे. उंच माणसे, सूर्याचा मुकुट धारण करणारी माणसे. सार्वजनिक जीवनात आणि व्यक्तिगत विचारात धुक्याच्यावर जगणारी माणसे .परमेश्वरा अशी माणसे दे अशी भावना मनात ठेवून लोक हितासाठी आंदोलन मग्न असणाऱ्या पाचव्यांदा खासदार झालेल्या भावना गवळी यांना हार्दिक शुभेच्छा.!
लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार आहेत.



