Breaking

Post Top Ad

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

विधान परिषद निवडणूक:ऊत्तरांच्या अपेक्षेत काही प्रश्न!

विधान परिषद निवडणूक:ऊत्तरांच्या अपेक्षेत काही प्रश्न!
राज्यात सध्या  सुरु असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या धुमश्चक्रीने काही मुलभूत प्रश्न उपस्थित केले आहे. एक म्हणजे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात शिक्षकांच्या शिवाय इतर उमेदवारांनी ऊभे रहावे काय? दुसरा असा की राजकीय पक्षांनी या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करावेत काय? तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विधान परिषदेत निवडून गेलेल्या आमदारकीचा राजीनामा देऊन विधानसभा किंवा लोकसभा लढवावी काय? घटनाकारांच्या भावनेचा विचार केला तर तीनही प्रश्नांचे उत्तर नाही असेच आहे.निवडणुकांना राजकीय आखाड्याचे स्वरूप आले आहे. पुणे पदवीधर मतदार  संघात तर भाजपचे संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार अरूण लाड हे दोघेही साखर सम्राट आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात अकरावी नापास आणि बारावी पास असलेले ही उमेदवार आहेत. लोकशाहीची यापेक्षा आणखी काय थट्टा  असु शकते.आणखी एक प्रश्न असा की, जे उमेदवार विधान परिषदेत कोणत्यातरी मतदार संघातून निवडून येतात त्यांनी सत्ता लोभापायी किंवा राजकीय स्वार्थापायी देऊन विधान सभा किंवा लोकसभा लढवून विजय प्राप्त केल्यानंतर विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देतात.रिक्तजागी ऊर्रवरित काळासाठी निवडणूक घ्यावी लागते.सारा खर्च सरकारच्या अर्थात जनतेच्या बोकांडी बसतो.

सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ब्लॅंकेट साड्या पैसे वाटल्या जातात हा प्रकार याही मतदारसंघात एका उमेदवाराने केल्यामुळे आचारसंहिता भंगाचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे.

धनंजय मुंडे, चंद्रकांत 'दादा' पाटील,निलय नाईक,अमरीश पटेल, तानाजी सावंत अशा पुष्कळ जणांनी विधानसभा निवडणूक लढली. जे निवडून आले आले त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला.त्यांच्या रिक्त जागी निवडणूक झाली. जे पराभूत झाले, उदाहरणार्थ भाजपचे निलय नाईक यांनी पुसद मतदार संघातून विधान सभा निवडणूक लढवली होती. त्यांचा दारुण पराभव चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रजीत मनोहर नाईक यांनी केला. मात्र निलय नाईकांची विधान परिषदेची  आमदारकी कायम राहिली. नितीन गडकरी यांनी नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर लोकसभा लढवली होती. विजय प्राप्तीनंतर परिषदेचा राजीनामा दिला होता. ते केंद्रात मंत्री झाले. त्यांच्या रिक्तजागेसाठी निवडणूक झाली. राजकीय नेत्यांच्या सत्ता लोभाने जनतेवर बसणारा भुर्दंड जनतेने सहन का करावा ? तो या अशा आमदारांकडून वसूल केला पाहिजे. खरेतर घटनेत दुरुस्ती करून विधान परिषदेवर कींवा राज्यसभेवर निवडून गेलेल्या आमदार खासदारशला अन्य सत्तेसाठी राजीनामा देता येणार नाही अशी तरतूद केली पाहिजे.

प्रा.न.मा.जोशी - ८८०५९४८९५१

हे खरे आहे की राजकीय पक्षांच्या चिन्हावर विधान परिषदेची निवडणूक लढली जात नाही.पण राजकीय पक्षांच्या समर्थनावर उमेदवार उभे असतात. प्रमाणशीर प्रतिनिधित्वच्या एकलसंक्रमण मतदान पद्धतीने ही निवडणूक होत असते. गंमत म्हणजे अनेक उमेदवारांनाच ही पद्धत समजत नाही.मतदाराला आपल्या पसंतीचे क्रमांक मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर नोंदवावे लागतात चिन्हांचा प्रश्न या निवडणुकीत नसतो. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप साखर सम्राट संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे या मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष दादा पाटील गेल्या खेपेला निवडून आले होते. मात्र त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा देऊन विधानसभा लढवली होती. सत्तेत सहभागी व्हायचे होते. चंद्रकांत पाटलांच्या पूर्वी प्रिय मंत्री प्रकाश जावडेकर हे या मतदारसंघातून निवडून आले होते. याचा अर्थ मतदारदार संघ भाजपचा बालेकिल्ला समजल्या जातो तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा कुंडलीच्या क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे. संग्राम देशमुख आणि अरुण लाड सहकार क्षेत्रातील सम्राट आहेत. जनता दलाचे शरद पाटील हेही मैदानात आहेत निवडणुकीला पूर्णतः राजकीय स्वरूप आल्यामुळे पदवीधरांचे प्रश्न बाजूला पडले आहे.


चंद्रकांत दादा विधान परिषदेत आमदार असताना सत्तेच्या लोभापायी विधानसभा विधान लढून परिषदेची आमदारकी सोडणारे जसे भाजपमध्ये आहेत तसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आहेत आणि कांग्रेस व शिवसेनेत ही आहेत. शिक्षक  मतदार संघात उमेदवार शिक्षक असला पाहिजे.घटना निर्माण झाली तेव्हा या समाजात शिक्षकांना अत्यंत सन्मान होता. मान्यता प्राप्त व्यक्तीचे आणि बुद्धिमान असलेल्या पदवीधरांचे प्रतिनिधित्व कायद्याच्या निर्मितीत झाले पाहिजे अशी घटनाकारांची त्यावेळची स्थिती होती. आमची जनता उच्च आदर्शांची वाट लावतील याची त्यांना कल्पना नव्हती असे माजी आमदार वसंतराव खोटरे आणि त्यांच्या पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार विकास सावरकर हे जाहीर सभांमधून सांगत आहेत. मतदारांनीच आता योग्य निर्णय घेतला पाहिजे असे वसंतराव खोटरे यांचे आवाहन आहे. वसंतराव खोटरे यांच्या सारखा विधान परिषदेचा अनुभव असलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवाकरराव पांडे यांनी  देखील भूमिका घेतली आहे. शिक्षक मतदार संघात शिक्षकेतर व्यक्ती ची लुडबूड नको ही चर्चा जोरात आहे. विशेष म्हणजे शिक्षक मतदारसंघात २७पैकी २५ उमेदवार उच्चविद्याविभूषित आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील एमडी असलेले ,शिक्षण क्षेत्रात एम एड ,बी एड ,एल एलबी , एम पी एड, सेट नेट, पीएचडी उमेदवारही रिंगणात आहेत. बीई इलेक्ट्रॉनिक्स पासून तर पदव्युत्तर पदवी धारक ही आहेत. वकीलही आहेत . बारावी पास आणि 11 वी नापास असे दोन उमेदवारही आहेत. वर उपस्थित केलेले प्रश्न अनुत्तरित आहेत हे नाकारता येत नाही.

लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad