Breaking

Post Top Ad

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०

विधान परिषद निवडणुक:प्रा.बी.टी.देशमुख यांचे वज्रास्त्र !

विधान परिषद निवडणुक:प्रा.बी.टी.देशमुख यांचे वज्रास्त्र !
विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघात एक डिसेंबरला होणाऱ्या निवडणूकीत जे २७ उमेदवार उभे आहेत त्यापैकी विजूक्टा चे उमेदवार डॉ.अनिल बोर्डे यांना नुटा ने पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठिंबा जाहीर करताना नुटाचे माजी अध्यक्ष व विधान परिषदेत ३० वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार प्रा.बी.टी.देशमुख यांनी नुटा ची भूमिका असलेले एक पत्रक शिक्षक मतदारांना विनंती या मथळयाखाली प्रसिद्ध केले आहे.या पत्रकातून शब्द बाणांचा त्यांनी जो वर्षाव केला आहे त्यामुळे ‌ अनेक जण घायाळ झाले आहेत तर राजकीय पक्षांचे असली चेहरेही समोर आले आहेत.

अतिशय सविस्तर पणे अनेक मुद्यांचा उहापोह त्यांनी या पत्रात केला आहे.भाजप आणि शिवसेना युतीच्या आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकारांची नावे न घेता यांचे सरकार आणि त्यांचे सरकार असा उल्लेख करत दोन्ही सरकारांच्या विरोधाभासी आणि विसंगत वागण्याच्या भूमिकांची चांगलीचज्ञ बिन पाण्याने केली आहे.प्रत्येकाने ती वाचावी, निदान मतदारांनी तरी वाचावी,अशी अपेक्षा आहे.दुर्देवाने प्राध्यापकांच्यासाठी संघटना प्रसिद्ध करत असलेले नुटा बुलेटिन सुद्धा अनेक प्राध्यापक वाचत नाहीत.तरी देखील नुटा चे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी आणि बुलेटीन चे संपादक डॉ.विवेक देशमुख हे बी. टी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठेने ते बुलेटीन प्रकाशित करीत असतात.


बीटींच्या पत्रकात एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. मतदार संघात शिक्षक नसलेल्यांनी उभे राहू नये अशी जी चर्चा जोरात सुरू आहे त्यासंदर्भात हा मुद्दा आहे.बी. टी. देशमुख यांनी म्हटले आहे, एखादा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, एखादा समाजसुधारक,एखादा नामवंत विचारवंत हा शिक्षक नसेल पण शिक्षकांचे प्रश्न शिक्षकांच्या पेक्षा जास्त चांगल्या रीतीने मांडत असेल अशी मतदारांची खात्री असेल,अशा नामवंत अशिक्षक व्यक्तीला सुद्धा उभे राहता यावे यासाठी ही तरतूद आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.त्याच दृष्टीने शिक्षक आणि अशिक्षक या प्रश्नाचा विचार झाला पाहिजे. निवडून जाणारा शिक्षकच असला पाहिजे या भावनेचा आदर झाला पाहिजे.

प्रा.न.मा. जोशी - ८८०५९४८९५२


पण सध्या या मतदार संघात इतक्या उच्च दर्जाचे  अशिक्षक असलेले शिक्षण तज्ज्ञ दिसत नाहीत.त्यामुळे शिक्षकांच्या भावनेचा आदर झाला पाहिजे ही भूमिका प्रा.देशमुख यांनी घेतली आहे.हे त्यांचे पत्र म्हणजे उपहास, उपरोध व वक्रोक्ती या साहित्य अलंकारांचा अत्यंत मार्मिक असा नमुना आहे."यांचे" सरकार आणि "त्यांचे" सरकार हे शब्द वापरत मतदारांना कोणाचे सरकार हे सहज लक्षात येते. इतर उमेदवारांची, संघटनांचीव व नेत्यांची नावे न घेता सा-यांची अशा उपरोधिक पद्धतीने केलेली साफसफाई व धुलाई बीटी शैलीचा ऊत्तम नमुना आहे.सुज्ञ मतदारांच्या हे लगेच लक्षात येते. बी. टी. देशमुख यांनी जे उमेदवार जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी साठी आम्ही कटिबद्ध आहेत. असा दावा करीत आहेत त्यांचा पक्ष सत्तेवर असताना आणि नसताना उलट भूमिका घेत आहे,अशा पक्षांचे बुरखे फाडले आहे. बीटी म्हणतात की, कालपर्यंत विरोधी पक्ष असलेल्या व आज सत्ताधारक असलेल्या पक्षाचे उमेदवार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शिक्षक पदवीधर मतदारसंघात उभे असून जुनी पेंशन योजना लागू करण्याला विरोध दाखवित आहेत.आता ती पेंशन योजना लागू करावी यासाठी ऊर बडवित आहेत.सत्ताधारी पक्षाच्या या प्रतिनिधींनी आपल्या पक्षाच्या पातळीवर आपला विचार प्रभावी करून शासन निर्णय निर्गमित करुन घेण्याचा राजमार्ग सोडून मतदार संघात रडारड करण्याचा रडकाढू पणा केला आहे.


काल सत्ताधारक असलेल्या व आज विरोधी पक्ष म्हणून शिक्षक मतदारसंघात अशिक्षक उमेदवारांना उभे करून जुन्या पेन्शन योजनेसाठी गळे काढण्याचा व रडारड करण्याचा जाहीर कार्यक्रम आजच्या विरोधी पक्षाने हाती घेतला आहे.“आमचा पक्ष पाच वर्ष सत्तेत होता. १ डिसेंबर पर्यंत तरी तुम्ही लक्षात घेऊन नका असे काही पक्षाचे प्रचारक मतदारांना सांगत आहेत.असे वाटते.अमरावती विभागातील पाचही जिल्हामुखयालयाच्या ठिकाणी प्रचारासाठी सभा घेता येत नसल्याबद्दल बीटींनी खंत व्यक्त केली आहे. घटनेच्या कार्यकारी मंडळात सुद्धा ज्यांना पाहिले नाही असे इंपोर्टेड उमेदवार सुद्धा मैदानात आहे.पूर्व-पश्चिम या उभय दिशांचा आनंद घेतलेल्या काहींनी निवड पश्र्चिममूर्ती सादर केलेली आहे.टपावरून वाटप करणारे काही उमेदवार आहेत.शिक्षक म्हणून काम न केलेले व शिक्षक नसलेले अर्धा डझन उमेदवार उपलब्ध आहेत. २०१४ च्या निवडणुकीत कोणतीही विनंती केली नव्हती.आजची स्थिती लक्षात घेता संघटनांनी स्वस्थ बसणे योग्य नाही असे वाटल्याने याबाबत तपशीलवार विचार विनिमय करून नुटाच्या कार्यकारी मंडळाने उपरोक्त निर्णय घेतलेला आहे.


तो म्हणजे विजूक्टाचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अविनाश मधुकर बोर्डे  यांना पाठिंबा देण्याचा.२७ उमेदवारांमध्ये ते सर्वात जास्त उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांना पसंतीचा प्रथम क्रमांक द्यावा अशी विनंती केली आहे.उल्लेखनीय म्हणजे मतदारांनी  एक दोन तीन चार असेसुद्धा पसंतीचे क्रमांक गोंदवले पाहिजेत .कारण ही निवडणूक प्रमाणशीर प्रतीनिधित्वाच्या एकल संक्रमण मतदान पद्धतीने होत असते. डॉ.अविनाश बोरडे, निलेश गावंडे, संगीता शिंदे-बोंडे तीन उमेदवारांनी एक पत्रक काढून पसंतीच्या प्रथम क्रमांकासाठी आम्ही मतदारांकडे विनंती करीत आहोत असे करत असताना पसंतीचा दुसरा व तिसरा क्रमांक सुद्धा अवश्य द्यावा अशी विनंती केली आहे. या विनंतीनुसार मतदारांनी अवश्य पसंतीक्रम नोंदवावेत अशी आपली विनंती असल्याचे बी.टी. देशमुख यांनी म्हटले आहे.पसंतीचा चौथा क्रमांक आपण आपल्या पसंतीनुसार द्यावा असेही त्यांचे आवाहन आहे. बी. टी. देशमुख यांचे हे पत्रक शिक्षक मतदारसंघात जोरदार चर्चेचा विषय झाला आहे.एका अत्यंत अभ्यासू संसदपटू सन्मानप्राप्त माजी आमदारांचे हे एक प्रकारे मनोगत असून आपण शिक्षकांसाठी काय केले याचाही सविस्तर लेखाजोखा या पत्रकात बी. टी. देशमुख यांनी घेतला आहे.

लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad