उमरेड : तालुक्यातील चांपा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लहानग्यांनी लोकशाही मूल्यांची उज्ज्वल झलक दाखवत विद्यार्थी ग्रामपंचायतीचा भव्य पदग्रहण सोहळा आणि मॉडेल बाल ग्रामसभा उत्साहात पार पडली. शाळेत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोबाईल ईव्हीएमच्या माध्यमातून विद्यार्थी ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीनंतर नव्या बाल सरपंच, उपसरपंच आणि बाल सदस्यांचा पदग्रहण सोहळा चांपा ग्रामपंचायत सभागृहात ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीच्या वातावरणात आयोजित करण्यात आला.
विक्रांत अरतपायरे यांनी बाल सरपंच म्हणून, तर संयुरी वरठी यांनी उपसरपंच म्हणून पदभार स्वीकारला. वेदांत लाडेकर, आदेश नारनवरे, लावण्या मडावी, धनश्री कंगाले, स्वरा खोंडे आणि सोनाली नेहारे यांनी बाल सदस्य म्हणून पदग्रहण केले. यानंतर मुख्यमंत्री समृद्धी ग्राम अभियानांतर्गत आयोजित मॉडेल बाल ग्रामसभेत बाल ग्रामस्थांनी नव्या बाल सरपंचांसमोर गाव विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न मांडले. गावात सर्वत्र सिमेंट रस्ते आणि बंधिस्त नालीची गरज, जिल्हा परिषद शाळेची जीर्ण इमारत दुरुस्ती, तसेच आरोग्य, स्वच्छता, विद्युतसारख्या मूलभूत सुविधा सुधारण्याची मागणी लहानग्यांनी गंभीरपणे मांडली.
त्याचबरोबर वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती, कचरा विलगीकरण, महिला बचत गट सक्षमीकरण, शालेय पोषण आहारातील सुधारणा आणि शाळा परिसर स्वच्छता याविषयीही त्यांनी ठोस सूचना दिल्या. बालग्रामस्थांनी केलेल्या सर्व प्रस्तावांना ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. सोनाली पवार यांनी मुख्य ग्रामसभेत मांडून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या उपक्रमाचे मार्गदर्शन सहायक गटविकास अधिकारी छत्रपाल पटले, गटशिक्षणाधिकारी मनोज पाटील, केंद्रप्रमुख चंद्रशेखर मेश्राम आणि मुख्याध्यापक नरेंद्र गावंडे यांनी केले. छत्रपाल पटले यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीचे चार स्तंभ – विधायिका, कार्यकारिणी, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे याचे सोप्या शब्दांत मार्गदर्शन केले आणि आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मुलांनी आपल्या पालकांना प्रेरित करावे, असे आवाहन केले. माजी सरपंच अतिश पवार यांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामपंचायत, शाळा आणि गटविकास विभागाचे चांपा ग्रामवासीयांच्या वतीने आभार मानले.
यावेळी सरपंच सौ. सोनाली पवार, उपसरपंच अर्चना सिरसाम, माजी सरपंच अतिश पवार, अधिकारी, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहान मुलांनी दाखविलेल्या जबाबदारीच्या भानाने आणि उत्साहाने ग्रामस्थ भारावून गेले. “आम्हीही यांच्यासारख्या उत्साहाने मतदानाला हजेरी लावली पाहिजे,” अशा प्रतिक्रिया अनेकांकडून उमटल्या. लोकशाही संस्कारांची बीजे रोवणारा हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत असून नव्या पिढीला जबाबदार नागरिक बनविण्याचा प्रभावी प्रयत्न ठरला आहे.
-----------------


