चाळीस शिवमार्गी वकिलांचा 11 वर्षापासून गडकिल्ले दर्शनाचा उपक्रम !

 

जालना :  चाळीस शिवप्रेमी वकिलांनी २०१५ मध्ये सुरू केलेला किल्ले दर्शनाचा उपक्रम आज सलग अकराव्या  वर्षीही यशस्वीपणे यशस्वी झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, त्यांच्या शौर्याने पावन झालेल्या किल्ल्यांना मानाचा मुजरा करावा, आणि इतिहास पुस्तकी न राहता प्रत्यक्ष सह्याद्रीच्या साक्षीने जाणावा या ध्यासातून हा उपक्रम सुरू झाला. 

रायगडापासून सिंहगड, तोरण्यापासून हरिश्चंद्रगड आणि विशालगडापासून खांदेरीपर्यंत महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक दुर्गम दुर्गांना भेट देत शिवमार्गी म्हणून ओळख मिळवलेल्या जालन्यातील वकीलांनी कोरोनाच्या काळातही हा उपक्रम अखंडित ठेवून इतिहासप्रेमाची परंपरा जपली. 

दरवर्षी दोन किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प कायम ठेवत आतापर्यंत 22 किल्ल्यांचे दर्शन घेण्यात आले आहे. यावर्षी महाराष्ट्रातील गिरीदुर्गांमधील सर्वांत उंच आणि आव्हानात्मक समजले जाणारे साल्हेर आणि रतनगड हे किल्ले उद्दिष्ट ठेवले होते. शिवमार्गी वकिलांनी हा दौरा नुकताच पूर्ण केला आहे.

भुईकोट, जलदुर्ग आणि गिरीदुर्ग हे किल्ल्यांचे तीन प्रकार. मराठा साम्राज्यात या तीनही प्रकारांची अनेक किल्ले आहेत. देशात सर्वांत जास्त किल्ल्यांची संख्या महाराष्ट्रात आहे. जवळपास ३६५ किल्ल्यांचा समृद्ध असा ऐतिहासिक वारसा महाराष्ट्राला लाभलाय. म्हणूनच या किल्ल्यांची भ्रमंती करण्याचे स्वप्न प्रत्येक शिवप्रेमी उराशी बाळगतात. असेच स्वप्न जालन्यातील सुमारे चाळीस वकीलांनी 11 वर्षांपूर्वी पाहिले आणि तात्काळ ते अंमलात आणले. यात आजपर्यंत खंड पडलेला नाही. यावर्षी महाराष्ट्रातील गिरीदुर्ग प्रकारच्या सर्वांत उंच अशा साल्हेर आणि रतनगड किल्ल्यांना भेट दिली.   

याशिवाय आतापर्यंत पाहण्यात आलेल्या किल्ल्यांमध्ये२०१५ - रायगड, मुरूड जंजिरा, २०१६ - पन्हाळा, सिंधुदुर्ग, २०१७ - प्रतापगड, विजयदुर्ग, २०१८ - पुरंदर, सुवर्णदुर्ग, ०१९ - शिवनेरी, मुरूड जंजिरा, २०२० - सिंहगड, वासोटा २०२१ - तोरणा, विशालगड, २०२२ - राजगड, रायगड२०२३ - हरिश्चंद्रगड, खांदेरी आणि लोहगड २०२४ - अजिंक्यतारा, जयगड आणि विजापुरतर या 11 व्या वर्षी साल्हेर आणि रतनगड या किल्ल्यांचा समावेश आहे.

जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध घुले पाटील यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या सुवर्ण इतिहासाचे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यांच्या पराक्रमाची खरी प्रचिती पर्वत, दऱ्या, कडे आणि किल्ल्यांच्या भव्यतेतूनच येते. किल्ले दर्शनातून मिळणारी ऊर्जा आणि प्रेरणा ही प्रत्येक शिवप्रेमीसाठी आयुष्यभर पुरण्यासारखी आहे. 

माजी जिल्हा सरकारी वकील ॲड. सुनिल किनगांवकर यांनी सांगितले की राज्याचा इतिहास जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे किल्ल्यांना भेट देणे आणि तेथील प्रत्येक दगडाशी संवाद साधणे. किल्ले वाचण्यापेक्षा किल्ले अनुभवणे अधिक आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. 

माजी अध्यक्ष ॲड. सय्यद तारीक यांनी आठवण करून दिली की २०१५ मध्ये किल्ले दर्शनाची कल्पना संघासमोर मांडताच सर्वांनी एकमताने संमती देत हा उपक्रम सुरू झाला आणि परस्परसन्मान, ऐक्य आणि सातत्य हेच या मोहिमेचे बलस्थान ठरले. 

माजी उपाध्यक्ष ॲड. परमेश्वर गडगीळे यांनी सांगितले की महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांचे दर्शन घ्यावेच या संकल्पाने सुरुवात झाली आणि शिवचरित्र हाच आमचा मार्गदर्शक असल्याने या उपक्रमात कोणत्याही परिस्थितीत खंड पडू दिला नाही.

शिवमहाराजांच्या पराक्रमाचे जिवंत स्मारक असलेले किल्ले महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक आहेत. सह्याद्रीच्या उंच शिखरांवर आणि खोल दऱ्यांमध्ये उभे राहून महाराजांनी स्वराज्याची निर्मिती विळख्यातील शत्रूंना छेद देत जगाला पराक्रमाचे उदाहरण दिले. 

जालन्यातील शिवमार्गी वकीलांची ही प्रेरणादायी मोहीम इतिहास जपण्यासोबत नव्या पिढीपुढे छत्रपतींचा स्मरणीय वारसा पोहचवण्याचीही भूमिका बजावत आहे. अकराव्या वर्षी साल्हेर आणि रतनगड किल्ल्यांचे दर्शन घेत ही मोहीम  पुढे सुरू ठेवली आहे.



------------




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने