यवतमाळ : केळापूर तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यालगत असलेल्या गावात वाघाने धुमाकूळ घातला आहे. या वाघाच्या हल्ल्यात गावकरी जखमी होत असून शेतक-यांच्या जनावरांची शिकार होत आहे. त्यामुळे वाघाचा नागरी वस्त्यांमध्ये प्रवेश होणार नाही, यासाठी उपायोजना कराव्यात, असे निर्देश वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान यावेळी वनमंत्री राठोड म्हणाले, नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वीस जणांच्या टीमने दिवसरात्र पेट्रोलिंग करावे. लोकांच्या संपर्कात राहून गावकऱ्यांना धीर द्यावा. तसेच या वाघाला पकडण्यासाठी रॅपिड रेस्क्यू टीम आणि विशेष व्याघ्र संरक्षण दल वाहनांसह तैनात करावी. गावकऱ्यांना आपापली जनावरे चराई संदर्भात जमीन उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव मांडण्यात येईल. टिपेश्वर अभयारण्यालगत असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना मागणी केल्यास त्यांना ७५ टक्के अनुदानावर सोलर फेंन्सिगचा लाभ द्यावा. अभयारण्यालगत तारेचे कुंपण घालावे. जेणेकरून वन्यप्राणी नागरी वस्त्यांमध्ये येणार नाही. तसेच वन्यप्राण्यांकडून होणारी नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश वनमंत्र्यांनी दिले.
वाघाच्या हल्ल्यात पशुधनाचे नुकसान झालेल्या गावकऱ्यांना वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते एकूण दोन लक्ष रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. यात सुकळी येथील रामबाई आत्राम यांना तीस हजार रुपयांचा धनादेश, टेंभी येथील सागर रामगिरवार (तीस हजार रुपये), गजानन शेंडे (एकवीस हजार रुपये), संतोष सैपटवार (१८ हजार ७५० रुपये), सुन्ना येथील अरुण जिड्डेवार (१९ हजार पाचशे रुपये), विजय एंबडवार (आठरा हजार सातशे पन्नास रुपये), टेंभी येथील यादव बडवाईकर (सोहळा हजार पाचशे रुपये), अंधारवाडी येथील लिंगा मेश्राम (१५ हजार रुपये), इंद्रदेव कुमरे (साडे सात हजार रुपये),कोब्बई येथील मोरेश्वर कुमरे (११२५० रुपये), टेंभी येथील पंचफुला सोयाम (अकरा हजार २५० रुपये) यांना धनादेश देण्यात आले.
