Breaking

Post Top Ad

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

घराघरांत दरवळतोय रानभाज्यांचा सुगंध

घराघरांत दरवळतोय रानभाज्यांचा सुगंध
सध्या दैनंदिन आहारातील पालेभाज्या भाजीपाल्याच्या भावात मिळत आहेत. तरीही कंट्रोलचे गहु तांदुळ खाऊन जीवन जगणाऱ्या, किंबहुना हातावर आणुन पानावर खाणाऱ्या गोर गरीब मजुरांना या कोरोना महामारीच्या संकटामध्ये विकत घेणे शक्य नाही. मात्र बाजारात उपलब्ध असणाऱ्या भाजीपाल्यापेक्षा दर्जेदार आणि शरीरासाठी विविध पोषक गुणधर्मांनी आणि जिवनसत्वांनी रसाळलेल्या रानमेव्यांचा अर्थात रानभाज्यांचा आस्वाद गाव खेड्यातील जनता घेत आहे.

श्रावणामध्ये पंचक्रोशीतील तमाम घराघरांतील चुलींमधुन येणाऱ्या रानभाज्यांच्या सुगंधाने अवघा आसमंत दरवळुन निघतो आहे. वर्षा ॠतुत श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, असे मनमोराचा पिसारा फुलविणारे आल्हाददायक वातावरण असते. शिवाय याच दरम्यान रानाशिवारात रानभाज्यांची रेलचेल असते. त्याची चव चाखण्यासाठी प्रत्येकाचीच जीभ आसुसलेली असते. केवळ कल्पनेनेच तोंडातील लाळोत्पादक ग्रंथी अधीक सक्रिय होत असते. 
दऱ्या  खोऱ्यात, रानाशिवारात सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांमध्ये, "चुचू ,कुंजर, तरोटा, रानघोळ, चाकवत, रानअंबाडी, फांदो, करसकोसला, रानचवळी, चिवळ, कड्डु, कटुले, वाघाटे, तांदूळजीरा, टेकुळ, माठ, तितरबाटी, हाडजोडी, तिकी, राजगीरा, घोळ, वडवांगे, कडु शेलनी, करडकोसला, ऊंबरदोडी, गोंदन  ,खडकशेपु करडु, घुगरी, खदंगा, रानफळ, रानकंद, अशा वही भरतील ईतक्या रानभाज्यांचा समावेश आहे."टेकुळ" ही रानभाजी रानमेवा हे "भूछञ "किंबहुना "मशरुम"या नावाने ओळखली जाते, हे केवळ श्रावणातच मिळते. 

आभाळात गडगडाट निर्माण झाल्या नंतर डोंगराच्या पायथ्याशी आणि रानाशिवारात धरणीच्या वर येते  असी खेडेगावातील वयोवृद्धांची धारणा आहे. आता या टेकुळचे (मशरुम) उत्पादन देशातील अनेक राज्यात कृत्रीम पद्धतीने घेतले जाते. देशात १९७२ च्या दशकात दुष्काळाचे सावट मानगुटीवर बसले होते. तेव्हा याच रानभाज्यांच्या भाकरी खाऊन पोटाची आग शमविल्याचे वयोवृद्ध सांगतात. निसर्गाने अतिशय मुक्त हस्तांनी उधळण करत, मानवासह, सृष्टी तील तमाम चिमण्या पाखरांना, पशु प्राण्यांना आपली भुकेची आग शांत करण्यासाठी या रानभाज्या विना लागवड करता बोनस मध्ये दिल्या आहेत. शतप्रतिशत नैसर्गिक ऊत्पन देणार्या असंख्य रानभाज्यांची वेलु अमर्याद वाढत असते. खत,फवारनी नाही. कुठेही स्वतंत्र लागवड नाही. तरीही या रानभाज्या पिढ्यानुपिढ्या आपल्या जीभेचे चोचले पुरवते आहे. 

यवतमाळ ते आर्णी या राष्ट्रीय महामार्गावर भांब (राजा)हिवरी, अर्जुना, माळमसोला, मांगुळ (तरोडा)आणि विषेशतः आभाळाचे मुके घेत आभाळाशी स्पर्धा करणार्या प्रसिद्ध मनदेव वनपरिक्षेत्रात चाॅकलेट च्या भावात द्रोणभर रानभाजी विकली जाते. ही रानभाजी सांज चुल पेटविण्यासाठी मायबापाला चार दोन आण्याची मदत करण्यासाठी धडपडणारी, गोर गरीबांची मुले विकत असतात. या रानभाज्यांचा बहुधा शहरी जनतेला परीचय नसतो. माञ ग्रामीण लोक या बाबत जणु वनस्पती तज्ञ आहेत. विशेषतः महालक्षमी स्थापनेच्या वेळी वाघाट्याची भाजी हमखास करावी लागते. ती महालक्षमीला अत्यंत प्रिय आहे अशी वंदता आहे. सोळा भाज्यांमध्ये ही भाजी हमखास आढळते. देवि, देवतांनाही या रानभाज्या आवडीच्या आहेत. हेच यावरुन दिसुन येते. तण नाशक औषधी फवारनी मुळे दुर्मिळ अनेक रानभाज्या दुर्मिळ होत आहेत. निसर्गाचा हा अनमोल ठेवा जतन करणे गरजेचे आहे. नेमका हाच संदेश मला पंचक्रोशीत पेरायचा आहे. 

देवानंद जाधव,मंगरूळ (यवतमाळ)
98 81 139 126 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad