जालना : दहा साहित्यिक मैत्रिणींची एकत्रित कलाकृती असलेल्या "काव्य-सरिता" या संपदा काटे कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या, काव्य संग्रहाचे प्रकाशन नुकतेच प्रसिद्ध लेखिका प्रा. स्नेहल पाठक जेष्ठ माजलगाव यांच्या हस्ते थाटात आणि उत्साही वातावरणात झाले.
या पुस्तकाची सविस्तर आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना प्रा. स्नेहल पाठक यांचीच आहे. त्यांच्याच हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. अनुभवी आणि नव कवींच्या कलाकृतीला या मोठे कठीण काम माध्यमातून व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या या उपक्रमाचे त्यांनी भरभरून कौतुक केले. अशा प्रकारचा उपक्रम राबवणे हे सोपे काम नाही. त्यासाठी संवेदनशील मन लागते हे सांगताना सगळ्यांना सोबत घेऊन एखादी कलाकृती उभारणे हे मोठे कठीण काम संपदा काटे कुलकर्णी यांनी उत्कृष्टरित्या केल्याचे अधोरेखित केले.
पुस्तकात आपल्या कलाकृती सादर करणाऱ्या साहित्यिक कवयित्रींना त्यांनी मार्गदर्शन करत पुढील लिखाणासाठी आत्मविश्वास दिला. यावेळी त्यांनी इतरांच्या कविता ,साहित्य वाचावे यामुळे आपण व्यापक विचार करू शकतो, त्याप्रमाणे लिहू शकतो हे सांगताना त्यांनी इतरांच्या साहित्यकृतीचे कौतुक करता यायला हवे हे पण साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले.
साहित्य लेखनाची प्रांजळ भूमिका असेल तर ,असे साहित्य वाचक-रसिकप्रिय ठरते. कथा, कविता,ललितलेखन, कादंबरी यातून येणारे चित्रण हे अभिव्यक्तीचा उत्कट हुंकार असतो. साहित्यातही कविता हे माध्यम व्यक्त- अभिव्यक्त होण्याचे प्रभावी असे काव्य माध्यम असते, बदलत्या काळानुसार सामाजिक संदर्भ जसे बदलतात तसे त्याचे प्रतिबिंब मनामनात उमटत असते. आजचे युग हे अतिजलद तंत्रज्ञानाचे नव्हे तर त्याहीपुढील एआयचे आहे. काळ बदलला की विचार बदलतात तशा जाणिवाही बदलतात. मानवी जीवनाचे अनेक पैलू हे संवेदनशीलतेवर आधारित असतात. यातही पुरुषापेक्षा स्त्री मन अधिक हळवे आणि संवेदनशील असते. मनातील विचार शब्दाच्या माध्यमातून उतरवत त्याला काव्य सरितेचे रुप देत अभिव्यक्तीचा जागर दहा मैत्रिणीनी मांडत अनोखा कवितासंग्रह तयार केला आहे. अशा शब्दात सुहास सदाव्रते यांनी या पुस्तकाचे परीक्षण केले आहे.
जालन्यातील दहा साहित्यिक मैत्रिणींची एकत्रित असलेली एक साहित्यकृती म्हणजे काव्यसरिता कवितासंग्रह. काळकुठलाही असो, स्त्री ही संवेदनशील असते, तशी ती सहवेदना जपणारी असते. अशा निरीक्षणाना एकत्रित एकाच धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न काव्यसरिता च्या माध्यमातून करण्यात आला आहे. अशी भूमिका संपदा काटे- कुलकर्णी यांनी मांडली.
या कविताग्रहात स्त्री जीवन, पदर, माहेर, मन, महिला दिप, तारुण्य, बालपण अशा विषयांच्या कविता अधिक आहेत. जालन्यातील स्वाती रत्नपारखी, रंजना मांटे सीमा कंडारे, मयुरा देशमुख, सुहद नाईक, संपदा कुलकर्णी, वैशाली खेडकर, अपर्णा वाजपे, रेणुका सहस्रबुध्दे, आरती सदाव्रते या साहित्यिक मैत्रिणीच्या प्रत्येकी चार पाच कविता आहेत.
-----------------------------

