दिल्लीतील भेटीनंतर एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती; महायुतीत नाराजी नाही, बिहार विजयाचे अभिनंदन

नवी दिल्ली : महायुतीत सुरू असलेल्या नाराजीच्या चर्चांना आज नवी दिशा देणारी घडामोड झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर गेले आणि संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने शिवसेनेत नाराजी असल्याच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. अलीकडेच महायुतीतील पक्षांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत गैरहजर राहिल्याने वातावरण तापले होते. 

त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी सामूहिक बैठक घेऊन पक्षांतरावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी स्वतःच या चर्चांना पूर्णविराम देत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी सांगितले की त्यांचा दिल्ली दौरा हा राजकीय तक्रारींसाठी नसून बिहारमधील विजयाचे अभिनंदन करण्यासाठी होता. बिहारमध्ये सरकार स्थापन होत असून उद्या शपथविधी होणार असल्याने त्यांना आमंत्रण मिळाले असून त्याच अनुषंगाने अमित शहांची भेट झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

शिंदे म्हणाले की, या भेटीत कोणत्याही प्रकारच्या तक्रारींची चर्चा झाली नाही, उलट एनडीएच्या यशाबद्दल सकारात्मक संवाद झाला. एनडीएमधील नाराजीबाबत विचारले असता शिंदे यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, ते तक्रारी करणारे नाहीत, तर लढणारे आहेत. छोट्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर नेल्या जात नाहीत आणि महायुतीतील अंतर्गत मतभेद स्थानिक पातळीवरच सोडवले जातात. 

कालच महायुतीच्या नेत्यांनी बसून चर्चा केली असून सर्व मतभेद मार्गी लागल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकांना महायुती एकजुटीने सामोरे जाईल आणि विधानसभेतील यशाप्रमाणेच पुढील निवडणुकांमध्येही विजय मिळेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. अमित शहांना भाजपच्या काही नेत्यांची तक्रार केल्याच्या चर्चांना शिंदे यांनी ठाम नकार दिला. 

त्यांनी स्पष्ट केले की शहांसोबत झालेली भेट केवळ बिहार निवडणुकीतील विजयाचे अभिनंदन करण्यापुरतीच होती आणि कोणतीही नाराजी किंवा तक्रार त्यात मांडलेली नाही. त्यामुळे महायुतीत मतभेद वाढत असल्याची चर्चा आधारहीन असल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले आहे.


             --------------------------------------------




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने