Breaking

Post Top Ad

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

"जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असताना बिनधास्त वागणे सोडा"; जिल्हाधिकारी

जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असताना बिनधास्त वागणे सोडा; जिल्हाधिकारी
यवतमाळ, दि. १२ ऑगस्ट  जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गत चार दिवसांत रोज पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या शंभरी पार करीत आहे. शासनाच्या धोरणानुसार आपण ‘अनलॉक’ प्रक्रियेमध्ये असलो तरी नागरिकांनीसुध्दा जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. मात्र नागरिकांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचे अजूनही गांभीर्य नाही. त्यामुळे स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबासाठी आतातरी बिनाधास्त वागणे सोडा, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले.

जिल्ह्यातील कोरोनाविषयक माहिती देण्यासाठी नियोजन भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रंसगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात तीन पॉझिटीव्ह रुग्णांपासून सुरवात झाली असून आजघडीला हा आकडा १८६५ वर पोहचला आहे. तरीसुध्दा नागरिकांना याचे गांभीर्य नाही, ही खेदाची बाब आहे. अनेक जण विनामास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता बिनधास्तपणे फिरतांना आढळतात. शासनाकडून दंड वसूल केला जातो. मात्र दंडात्मक कारवाईपेक्षा नागरिकांनाच स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची जास्त काळजी असायला पाहिजे. कोरोनामध्ये प्रशासनातर्फे वेगळे काही करायची गरज नाही. सर्व शासनाच्या निर्देशानुसारच होते.

जिल्ह्यात ‘होम आयसोलेशन’ सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत ४४ जणांना ही सुविधा देण्यात आली असून यासंबंधित शासनाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. लक्षणे नसली तरी पहिले दोन दिवस कोव्हीड केअर सेंटरमध्ये तपासणी केली जाते. होम आयसोलेशन हवे असणा-या व्यक्तिच्या घरी चार स्वतंत्र खोल्या, स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था आवश्यक आहे. पल्स ऑक्सीमीटर त्याने स्वत: विकत घेऊन स्वत:चे एसपीओटू चेक करावे व डॉक्टरांना त्याबाबत अवगत करावे. कोरोनासंदर्भात खाजगी रुग्णालयात तसेच दुस-या जिल्ह्यात उपचाराची सुविधा आदी शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार देण्यात येत आहे. खाजगी डॉक्टरांनी सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण तपासण्यासंबंधी प्रशासनाकडून कोणतेही निर्बंध घालण्यात आले नाही. ॲन्टीजन किटसाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी दोन कोटी रुपये मंजूर केले आहे. यात जिल्ह्यासाठी ३२५०० किट खरेदी करण्यात आल्या असून आणखी ३० हजार किट खरेदी करण्याला मंजूरी देण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
दि.१० मार्च ते ७ जूनपर्यंत २३०० नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. मात्र जिल्ह्यात व्हीआरडीएल लॅब सुरु झाल्यानंतर ७ जूनपासून आतापर्यंत जवळपास २५ हजार नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. प्रत्येक तहसीलमधून रोज किमान ५० नमुन्यांची तपासणी करण्यात येते. याप्रमाणे ॲन्टीजन आणि आरटीपीसीआर दोन्ही मिळून रोज ८०० नमुन्यांची तपासणी होत आहे.जिल्ह्यात प्रत्येक दहा लाख लोकसंख्येमागे ३०० नमुन्यांची तपासणी करण्यात येते. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार ही संख्या १४० असून आपल्या जिल्ह्यात २०० टक्के तपासणी होत आहे. त्यामुळे संपर्कातील नागरिकांची ट्रेसिंग चांगली होते. जिल्ह्यात मृत्यु दर हा २.६८ टक्के असून पॉझिटीव्ह रुग्णाचा दर हा ७.७ टक्के आहे. पॉझिटीव्ह दर हा १० टक्क्यांपेक्षा कमी असायला पाहिजे, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.
दि.१० मार्च रोजी जिल्ह्यात सर्वात प्रथम पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. आज ही संख्या १८६५ वर गेली आहे. यापैकी १२५० जण बरे होऊन घरी गेले आहेत. यात ७०७ पुरुष आणि ५४३ महिला आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५७९ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह आणि इतर जिल्ह्यातील पाच जण असे एकूण ५८४ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण भरती आहेत. सुरवातीच्या अडीच महिन्यात म्हणजे २९ मे पर्यंत पहिल्या १५० ते १६० रुग्णांमध्ये जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला नव्हता. आज मात्र जिल्ह्यात मृत्युचा आकडा ५० असून ३२ पुरुष आणि १८ महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील १३, नेर शहर व ग्रामीण भाग प्रत्येकी दोन, दारव्हा शहरातील तीन, दिग्रस शहरातील तीन व ग्रामीण भागातील दोन, आर्णि शहरातील दोन, पांढरकवडा शहरातील दोन, महागाव शहरातील दोन, उमरखेड शहर व ग्रामीण भागातील प्रत्येकी तीन, पुसद शहरातील नऊ व ग्रामीण भागातील दोन, झरी ग्रामीण भागातील एक, कळंब ग्रामीण भागातील एकाचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सारीचे ५८१ रुग्ण भरती झाले असून यापैकी ५६ पॉझिटीव्ह आले आहेत. सारी आणि कोरोना पॉझेटिव्ह असलेल्या ४३ आणि फक्त सारी असलेले ४२ जण असे एकूण ८५ मृत्यु झाले आहेत.

जिल्ह्यात सद्यस्थितीत १३७ प्रतिबंधित क्षेत्र आहे. प्रत्येक पथकामध्ये दोन याप्रकारे २६५ पथकाद्वारे एकूण ५३० कर्मचा-यांकडून घरोघरी सर्व्हे करण्यात येत आहे. आतापर्यंत ९५०० घरांचा सर्व्हे झाला असून २१२० नमुने घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील ३७ कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण बेडची क्षमता २९५६, सहा कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये बेडची क्षमता ५८० आणि वैद्यकीय महाविद्यालयात आयसोलेशन वॉर्डात ५०० बेड असे जवळपास चार हजार बेड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. यापैकी आतापर्यंत केवळ १५ टक्के बेड उपयोगात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व कोव्हिड केअर सेंटरमधील आतापर्यंत २८४ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह, कोव्हीड हेल्थ सेंटरमधील १८६ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आणि वैद्यकीय महाविद्यालयातील १०१ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. गृह विलगीकरणात आतापर्यंत ३४९५ तर संस्थात्मक विलगीकरणात १३६ जण दाखल झाले. जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून ९२ फिवर क्लिनीक सुरु करण्यात आले. याद्वारे आतापर्यंत १८१५७ जणांची तपासणी करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad