जिल्ह्यात ५५ लक्ष ६९ हजार क्विंटल कापसाची खरेदी
यवतमाळ: खरीप हंगामात बियाणे व खते घेण्यासाठी शेतक-यांच्या हातात पैसा असावा, तसेच पीक कर्जासाठी त्याला सावकाराच्या दारात जावे लागू नये, यासाठी शेतक-यांकडील कापूस हमी भावाने खरेदी करण्यासाठी शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी कापूस खरेदीबाबत वेळोवेळी सहकार विभागाचा आढावा घेतला. नोंदणी झालेल्या शेतक-यांचा कापूस खरेदी करण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले. त्याची फलनिष्पत्ती म्हणून जिल्ह्यात ५५ लक्ष ६९ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कापूस खरेदीमध्ये यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल असल्याचे सहकार विभागाने म्हटले आहे.
कापूस खरेदीत राज्य कापूस पणन महासंघाने ४५ हजार ५३४ शेतकऱ्यांडून १० लाख ६० हजार ५०० क्विंटल, सीसीआय ने १ लाख आठ हजार २५३ शेतकऱ्यांकडून २१ लाख ३० हजार क्विंटल, थेट पणन परवानाधारकांनी २८ हजार ८०६ शेतकऱ्यांकडून १ लाख ११ हजार ९०० क्विंटल, खाजगी बाजारात ४० हजार १५६ शेतकऱ्यांकडून १ लाख ९८ हजार क्विंटल, बाजार समितीमधील अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांनी ४६ हजार ८०२ शेतकऱ्यांकडून ११ लाख ६८ हजार क्विंटल कापूस खरेदी केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात एकूण २ लाख ६९ हजार ५३४ शेतकऱ्यांकडून तब्बल ५५ लाख ६९ हजार ५०० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे सुरवातीपासूनच नोंदणीकृत शेतक-यांच्या कापूस खरेदीबाबत अतिशय आग्रही होते. ठराविक वेळेत कापसाची खरेदी होऊन शेतक-यांना त्वरीत चुकारे मिळाले पाहिजे, असे आदेश त्यांनी दिले होते. यासाठी त्यांनी सीसीआय, कापूस पणन महासंघ, सहकार विभाग, संबंधित जिनिंग मालक यांच्या वारंवार बैठका घेतल्या.
लॉकडाऊनची परिस्थिती, जिनिंगमध्ये मजुरांची कमतरता, पावसाळ्याची सुरवात आदी बाबी असल्या तरी शेतक-यांच्या घरातील कापूस खरेदी झालाच पाहिजे, याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनीसुध्दा तालुक्यातालुक्यात जिनिंगला भेटी देऊन कापूस खरेदीबाबत प्रत्यक्ष आढावा घेतला. कुठे हेराफेरी झाल्याचे निदर्शनास येताच संबंधितांची कानउघडणी केली. या सर्व बाबींचा परिणाम म्हणून जिल्ह्याने ५५ लाख ६९ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी करून राज्यात अव्वल स्थान पटकाविले. जिल्ह्यात लॉकडाऊन नंतर ४९ हजार ५६ शेतकऱ्यांकडून ११ लाख ४८ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. तर कोव्हिड-१९ च्या प्रादुभावापूर्वी जिल्ह्यात २ लाख २० हजार ४७८ शेतकऱ्यांकडून ४४ लाख २१ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. जिल्ह्यात एकूण ५२ हजार ४५० शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. त्यात ४२ हजार ९१ शेतकरी पात्र ठरले होते.