Breaking

Post Top Ad

शनिवार, २५ जुलै, २०२०

कोरोनाबाधित मृत्यु थांबविण्यासाठी गांभिर्याने काम करा; जिल्हाधिकारी एम.डी.सिंह

कोरोनाबाधित मृत्यु थांबविण्यासाठी गांभिर्याने काम करा; जिल्हाधिकारी एम.डी.सिंह

संपर्क शोधणे, नमुन्यांची चाचणी, सारी व आयएलआयच्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश
यवतमाळ : जिल्ह्यात मृत्युंच्या संख्येत दिवसाआड वाढ होत आहे. ही आपल्या जिल्ह्यासाठी अतिशय दुर्देवी बाब आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु थांबविणे याला शासन आणि प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे पॉझेटिव्ह व्यक्तिंच्या संपर्कातील नागरिकांचा शोध, जास्तीत जास्त नमुन्यांची चाचणी, सारी किंवा आयएलआयसारख्या लक्षणांचे वेळीच निदान यावर विशेष लक्ष केंद्रीत करणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वांनी अतिशय गांभिर्यपूर्वक कामे करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले.

कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर नियोजन भवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते. 

२५ हजार ॲन्टीजन किटसाठी २ कोटी रूपये मंजूर
 जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांच्या नमुन्यांची तपासणी करण्याकरीता २५ हजार ॲन्टीजन किट खरेदी करण्यात येणार आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या सुचनेवरून जिल्हाधिका-यांनी यासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आहे. सदर किट प्राप्त होताच एका आठवड्याच्या आत संपूर्ण तालुक्यात देण्यात येईल. तसेच ॲन्टीजन किटद्वारे दरदिवशी किमान ३०० तपासण्या करण्याची सुचनाही त्यांनी दिल्या.   
मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर पहिल्या अडीच महिन्यात जिल्ह्यात एकाही मृत्युची नोंद नव्हती, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, सद्यस्थितीत मात्र हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसत आहे. त्यामुळे पॉझिटीव्ह रुग्ण आढळताच तो भाग त्वरीत प्रतिबंधित करून संबंधित रुग्णाच्या संपर्कातील हायरिस्क व लो-रिस्क व्यक्तिंचा तातडीने शोध घेणे, अत्यंत कमी वेळात संपर्कातील 100 टक्के लोकांचे नमुने तपासणीकरीता पाठविणे, याच बाबींना प्राधान्य ठेवा. यातील एक टक्का जरी लोक सुटले तर पुन्हा मानवी साखळी वाढण्याची शक्यता असते. तसेच आयएलआय (ताप, सर्दी, खोकला) किंवा सारी (ताप, सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास) ची लक्षणे तीन ते चार दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून असेल तर अशा व्यक्तिंचे नमुने त्वरीत प्रयोगशाळेत पाठवा. ग्रामस्तरीय तसेच तालुकास्तरीय समितीने यात निष्काळजीपणा करू नये. अन्यथा यासाठी संबंधित समितीवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल.

शहरी व ग्रामीण भागात नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी काळजीपूर्वक होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आयएलआय किंवा सारीची लक्षणे असलेले नागरिक सर्व्हेमधून सुटत आहे. अशी लक्षणे असलेले व्यक्ती अतिशय गंभीरावस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होत असल्याने त्यांच्यावर उपचारासाठी कमी वेळ मिळतो. पर्यायाने त्याची वाटचाल मृत्युकडे होते. त्यामुळे कोणतीही हयगय याबाबत खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांनीसुध्दा आपल्या जीवासाठी या बाबीकडे लक्ष द्यावे. कोव्हीड केअर सेंटरमधील नागरिकांचा ताप व एसपीओटू नियमित तपासा. पूर्वव्याधींनी ग्रासलेल्या नागरिकांची यादी शहरी आणि ग्रामीण भागात अपडेट असायला पाहिजे. अशा लोकांना नियमित फोन करण्यासाठी न.प. आणि तालुका स्तरावर कॉलसेंटर निर्माण करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

आयएलआय व  सारीची लक्षणे, को-मोरबीड (पूर्व व्याधींनी ग्रस्त) व्यक्ती, पॉझेटिव्ह व्यक्तिंच्या संपर्कातील शोध याबाबत सर्व नोडल अधिका-यांनी आपल्या अधिनस्त यंत्रणेकडून रोज आढावा घ्यावा. तपासणीकरीता नमुने देण्यासाठी नागरिकांनी कोव्हीड केअर सेंटरची भीती मनात बाळगू नये. निगेटिव्ह आले तर त्वरीत घरी जाता येते. पॉझेटिव्ह आले तर आपल्या जीवासाठी वेळेवर उपचार मिळण्यास मदत होईल. तसेच रोटेशन पध्दतीने वॉर्डनिहाय / क्षेत्रनिहाय भेटी देऊन नमुने जमा करता येईल का, याबाबतही नियोजन करावे, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, संबंधित नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad