Breaking

Post Top Ad

मंगळवार, १४ जुलै, २०२०

यवतमाळ जिल्हात काय बदल केलं? कसे आहेत नवीन नियम

यवतमाळ जिल्हात काय बदल केलं? कसे आहेत नवीन नियम
जिल्हाचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दि. १३ जुलै रोजी कोरोना रूगाणांची संख्या कमी करण्यासंदर्भात प्रशासनाला कडक धोरण राबविण्या संदर्भात कडक निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज दि. १४ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांनी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नवे नियम जाहीर केले आहे.

यवतमाळ : कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने अत्यावश्यक सेवा व इतर सर्व प्रतिष्ठाने, बाजारपेठ यांना मुभा देण्यात आलेल्या वेळ कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षेतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी जि.प.अध्यक्षा, सर्वपक्षीय आमदार, जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती, प्रादुर्भाव असलेल्या नगर पालिकांचे अध्यक्ष आदी उपस्थित होते.
सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांचेवर साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणी भारतीय दंड संहिता १८६० तसेच इतर संबंधीत कायदे व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा व इतर सर्व सेवेची आणि वस्तुंची दुकाने व बाजारपेठ दिनांक १४ जुलै २०२० च्या मध्यरात्री पासून ते पुढील आदेशापावेतो सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी आदेशीत केले आहे.

या कालावधीत पुढील बाबी, आस्थापना, व्यक्ती व समूहाला सुट राहील. सर्व अत्यावश्यक सेवा व इतर सर्व सेवेच्या वस्तुंची दुकाने तसेच भाजीपाला व फळे विक्री सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. आठवडी बाजार बंद राहील. ठोक भाजीमंडी सकाळी ३ ते ६ या कालावधीत सुरू राहील व तेथे फक्त किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील. दुध विक्रेत्यांना गल्ली, कॉलनी, सोसायटीमध्ये जाऊन सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत व सायंकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत घरपोच विक्री करता येईल. 
कृषी साहित्याची दुकाने, रासायनिक खतविक्री, बी-बियाणे विक्री व वाहतुक त्यांचे गोदामे, दुकाने सकाळी १० ते दुपारी ५ या कालावधीत चालू राहतील. सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी वैद्यकीय अत्यावश्यक सर्व सेवा तसेच पशुवैद्यकीय दवाखाने व औषधी दुकाने दररोज २४ तास सुरू राहतील. 
वॉटर सप्लायर्स यांना सामाजिक अंतराचे पालन करत सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत ग्राहकांना घरपोच सेवा देता येईल. हॉटेल-रेस्टॉरंट मधून पार्सल सुविधा सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहील. घरगुती गॅस घरपोच सेवा सकाळी ७ ते रात्री ७ यावेळेत वितरण करण्यास मुभा देण्यात येत आहे. परंतु गॅस वितरक कर्मचारी यांनी गणवेश व ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील. 
पेट्रोल डिझेल सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहील, मात्र अत्यावश्यक सेवेकरिता दररोज २४ तास सुरू राहील. शेतीच्या पेरणी, मशागतीस व संपुर्ण शेतीच्या कामास मुभा राहील. प्रिंट मिडीया, ईलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वर्तमानपत्र विक्रेते व वितरक यांना मुभा राहील.
अत्यावश्यक सेवेकरीता टु-व्हीलर या वाहनास १+१ मुभा राहील. मालवाहतुक सेवा पुर्ववत सुरू राहील. जिल्ह्यात औद्योगिक कारखाने शिफ्ट नुसार सुरू राहतील. तथापि उद्योजकांनी तेथील कामगार व कर्मचारी यांना शिफ्टनुसार ओळखपत्र तयार करून द्यावे. शिफ्टनुसार कर्मचारी व कामगार यांना कारखान्यात जाणे व कारखान्यातून घरी येणे याकरिता मुभा राहील. परंतु त्यांनी सोबत ओळखपत्र ठेवणे बंधनकारक राहील. 
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व बँका ग्राहकांसाठी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी बांधकामे सुरू राहतील. जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी व जिल्ह्यात प्रवेशासाठी केवळ वैद्यकीय व अत्यावश्यक कारणासाठीच ई-पास द्वारेच प्रवासाची मुभा राहील. तसेच कोणतेही व्यक्ती यांनी जिल्ह्याबाहेर प्रवास करून आल्यास त्यांना होमक्वारंटाईन राहणे बंधनकारक राहील.
संचारबंदीच्या कालावधीत लग्न सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत पार पाडणे बंधनकारक राहील. लग्न समारंभात व्यक्तीची मर्यादा ही ५० व्यक्तींची राहील. अंत्यविधीची प्रक्रीया पार पाडण्यास पुर्वी दिलेल्या अटी व शर्तीनुसार परवानगी राहील. जिल्ह्यातील सर्व देशी विदेशी दारु विक्री बार, सीएल ३, एफएल २  व एफएल ३ अनुज्ञप्ती सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत सुरू राहतील.

यवतमाळ जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता तंबाखू, सुपारी, पान पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनास, ई सिगारेटसह, थुंकण्यास व धुम्रपानास सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंध करण्यात आले आहे. तसेच चेहऱ्यावर मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे इत्यादी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर खालीलप्रमाणे दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल.

तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन, धुम्रपान करतांना व थुकतांना आढळल्यास रुपये एक हजार रुपये दंड व एक दिवस सार्वजनिक सेवा, दुसऱ्यांदा आढळल्यास रुपये ३००० दंड व ३ दिवसाची सार्वजनिक सेवा, तिसऱ्यांदा व त्यानंतर आढळल्यास रुपये ५००० दंड व ५ दिवस सार्वजनिक सेवा द्यावी लागेल. 
त्याचप्रमाणे सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न वापरणे यासाठी रुपये 200 दंड व तद्नंतर पुन्हा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल. दुकानदार, फळे, भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्यक वस्तु विक्रेते आणि ग्राहक यांनी सामाजिक अंतर न राखणे तसेच विक्रेत्यांनी मार्कींग न करणे यासाठी ग्राहकांना रुपये २०० दंड तर विक्रेत्यांना रुपये २००० दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल. किराणा जिवनावश्यक वस्तू विक्रेत्याने वस्तूंचे दरपत्रक न लावणे यासाठी रुपये २००० दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल.
सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने जाहिरात, व्यापार व पुरवठा आणि वितरण कायदा-२००३ मधील कलम ४ नुसार रुपये २०० दंड, कलम ५ नुसार पहिल्या गुन्ह्यासाठी १००० दंड किंवा २ वर्षे शिक्षा, दुसऱ्यांदा आढळल्यास रुपये ५००० दंड  किंवा ५ वर्षे शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा देण्यात येईल. उत्पादनाकरिता  कलम ७ नुसार पहिला गुन्हा रुपये ५००० दंड किंवा  २ वर्ष शिक्षा, दुसरा गुन्हा रुपये १०००० दंड किंवा पाच वर्षाची शिक्षा, तसेच विक्रेत्यांकरिता पहिला गुन्हा १००० दंड किंवा १ वर्ष शिक्षा, दुसऱ्यांदा आढळल्यास रुपये ३००० दंड किंवा २ वर्ष शिक्षा देण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad